भारत-ब्रिटनची नागरी अणुकरारावर स्वाक्षरी
By admin | Published: November 13, 2015 01:01 AM2015-11-13T01:01:56+5:302015-11-13T01:01:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लंडनमध्ये पाऊल ठेवत ब्रिटनसोबतच्या नव्या सहकार्य पर्वाचा प्रारंभ केला आहे. संरक्षण, व्यापार आणि काही क्षेत्रांत ९ अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीसह
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लंडनमध्ये पाऊल ठेवत ब्रिटनसोबतच्या नव्या सहकार्य पर्वाचा प्रारंभ केला आहे. संरक्षण, व्यापार आणि काही क्षेत्रांत ९ अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीसह नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करीत दोन देशांनी संबंध भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करीत विविध करारांची घोषणा केली.
आज आम्ही नागरी अणुकरारावर स्वाक्षरी केली असून, ही परस्परांविषयीच्या विश्वासाचे चिन्ह आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही असलेले देश आपल्या संबंधांची खरी ताकद ओळखू शकले नव्हते. मोदी आणि मला हे चित्र बदलायचे आहे, अशी ग्वाही कॅमेरून यांनी दिली. दोन्ही देश द्विपक्षीय शिखर परिषदांमधील सातत्य वाढविणार असून तंत्रज्ञान, संस्कृती, विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्याची नवीनवी दालने उघडतील. सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला ब्रिटन समर्थन देत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही कॅमेरून यांनी केली. प्रश्नोत्तराच्या सत्रात मोदींना भारतातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी छेडले असता मोदींनी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. भारत ही बुद्धाची भूमी आहे. आम्ही बेकायदेशीर बाबींना मुळीच थारा देत नाही. प्रत्येक घटनेची दखल घेत कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
ब्रिटनने येण्यास रोखले नाही...
ब्रिटनने २००३ मध्ये मला येथे येण्यापासून रोखले नव्हते. ब्रिटनच्या सरकारची कधीही ती भूमिका नव्हती, मला येथे येण्याची उत्सुकता राहिली मात्र येणे शक्य झाले नाही, असे मोदींनी एका उत्तरात सांगितले.
जगभरात उठू लागला आवाज : भारतीय लेखक आणि कलावंतांनी निषेध जाहीर करीत प्रतिष्ठित पुरस्कार परत केले असताना १७ आॅक्टोबर रोजी १५० देशांतील लेखकांनी त्यांना भक्कम पाठिंबा जाहीर करणारे पत्र जारी केले होते. भारताच्या असहिष्णुतेच्या मुद्याबाबत मोदींशी सार्वजनिक आणि खासगीरीत्या चर्चा करावी अशी विनंती या लेखकांनी कॅमेरून यांना पाठविलेल्या ताजा पत्रात केली आहे. भारतीय राज्य घटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखत लोकशाही स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने रक्षण केले जावे, असे या लेखकांनी स्पष्ट केले. शिवसैनिकांनी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील रद्द केलेला कार्यक्रम, सुधेंद्र कुलकर्णी यांच्यावरील शाई हल्ल्याकडेही लेखकांनी लक्ष वेधले.
भारतातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध जागतिक पातळीवर आवाज उठविला जात असून सलमान रश्दी, नील मुखर्जी, इयान मॅकइवान, हरी कुंझरू यांच्यासारख्या नामवंतांसह जगप्रसिद्ध २०० पेक्षा जास्त लेखकांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना खुले पत्र पाठवून भारतातील भयाच्या वातावरणाकडे लक्ष वेधले आहे. ब्रिटन भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेत हा मुद्दा लावून धरावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भारतातील मूलतत्त्ववादाला विरोध करणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या घटना वाढत आहे. भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे या लेखकांनी स्वाक्षरीनिशी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. जगभरातील मान्यवर लेखकांचा समावेश असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ या संस्थेने हे पत्र प्रकाशित केले आहे. या संस्थेच्या इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड येथील केंद्रातील सदस्यांनीही या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येकडे लक्ष वेधत भारतातील ४० लेखकांनी साहित्य पुरस्कार परत केल्याचा उल्लेखही या पत्रात आहे.
मोदींना गार्ड आॅफ आॅनर
द्विपक्षीय चर्चेपूर्वी मोदींना कॅमेरून यांच्या निवासस्थानाजवळ ट्रेझरी क्वॅन्ड्रँगल येथे आयरिश गार्डस् रेजिमेंटल बॅण्डचा समावेश असलेल्या ४८ सदस्यीय एफ कंपनीच्या स्कॉट रक्षकांनी मानवंदना (गार्ड आॅफ आॅनर) दिली. कॅमेरून यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट या निवासस्थानाबाहेर येत मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी जगविख्यात अशा राजकीय कार्यालयात सुमारे ९० मिनिटे चर्चा केली. ब्रिटनचे विदेश मंत्री फिलिप हेमंड यांनी संरक्षण आणि नागरी अणुसहकार्याबाबत विशेष भर दिला होता. मोदींनी सेंट जेम्स कोर्ट येथे कारमधून पाय बाहेर ठेवताच असंख्य समर्थकांनी ‘मोदी मोदी’ असा जयघोष केला. मोदींचा मुक्काम चेकर्स या १६ व्या शतकातील प्रासादात असेल. शुक्रवारी ते महाराणींसोबत बकिंगहम पॅलेस येथे भोजन घेणार असून, नंतर लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियमवर सुमारे ६० हजार भारतीयांना संबोधित करणार आहेत.
(वृत्तसंस्था)