अणुकेंद्र यादी भारत-पाकने एकमेकांना सुपूर्द केली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:33 AM2020-01-02T02:33:00+5:302020-01-02T02:33:31+5:30
करारातहत दोन्ही देशांना एक-दुसऱ्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास मनाई
नवी दिल्ली/इस्लामाबाद : एकोणत्तीस वर्षांची परंपरा राखत भारत आणि पाकिस्तानने बुधवारी द्विपक्षीय करारातहत आपापल्या अणुकेंद्राची यादी एकमेकांना सुपूर्द केली. या करारातहत दोन्ही देशांना एक-दुसऱ्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास मनाई आहे.
विदेश मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांनी भारत-पाकिस्तान दरम्यान अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास बंदी घालणाºया करारातहत आपापल्या अणुकेंद्राच्या यादीची देवघेव केली. ही देवाण-घेवाण दिल्ली आणि इस्लामाबादेत एकाच वेळी राजनैतिक मार्गाने करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान काश्मीर मुद्यावर राजनैतिक तणाव असतानाही दोन्ही देशांनी एकमेकांना आपापल्या अणुकेंद्राची यादी देऊन २९ वर्षांपासूनच्या परंपरेचे पालन केले.
हा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये स्वाक्षरित करण्यात आला होता, तर २७ जानेवारी १९९१ रोजी लागू करण्यात आला. या करारातहत दरवर्षी १ जानेवारी रोजी आपापल्या देशांतील अणुकेंद्राची यादी एकमेकांना अदान-प्रदान केली जाते. १ जानेवारी १९९२ रोजी पहिल्यांदा यादी अदान-प्रदान करण्यात आली होती. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पाकिस्तानमध्ये विदेश मंत्रालयात भारतीय उच्चायुक्तालयाच्या एका प्रतिनिधीकडे अणुकेंद्र आणि प्रतिष्ठानांची यादी सुपूर्द करण्यात आली.