इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:31 AM2024-07-08T11:31:26+5:302024-07-08T11:33:03+5:30
रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात खाण कामगार आणि खाणीच्या बाजुला राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाल्याचे बसरनास रेस्क्यू टीमचे प्रमुख हेरियांतो यांनी सांगितले
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीमध्ये भूस्खलन झाले असून यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप १८ लोक बेपत्ता आहेत.
रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात खाण कामगार आणि खाणीच्या बाजुला राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाल्याचे बसरनास रेस्क्यू टीमचे प्रमुख हेरियांतो यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या पाच लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित १८ जणांचा शोध सुरु आहे. आम्ही बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय बचाव पथक, पोलिस आणि लष्करी जवानांसह 164 कर्मचारी तैनात केले आहेत, असे ते म्हणाला.
भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बचाव कर्मचाऱ्यांना सुमारे 20 किलोमीटर चालत जावे लागले होते. स्त्यावरील चिखल आणि परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. भूस्खलनामुळे काही घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. एका पुलाचेही नुकसान झाले आहे. सोमवार आणि मंगळवारी या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये दक्षिण सुलावेसीमध्ये झालेल्या भूस्खलनात १८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर मे मध्ये पश्चिम सुमात्रा भागात पूर आणि चिखलयुक्त पाणी घुसल्याने ५० जणांचा मृत्यू झाला होता.