इंडोनेशिया : समुद्रातून मिळाले मानवी अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:52 AM2018-10-31T04:52:19+5:302018-10-31T04:52:50+5:30
विमानाचे मुख्य वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय होते आणि दिल्लीच्या मयूरविहार भागातील रहिवासी होते.
जकार्ता/ नवी दिल्ली : इंडोनेशियात लायन एअरचे विमान समुद्रात कोसळून १८९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागरी विमान महासंचालकांनी (डीजीसीए) बोइंग आणि अमेरिकेतील फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडे माहिती मागितली आहे. या विमानाचे मुख्य वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय होते आणि दिल्लीच्या मयूरविहार भागातील रहिवासी होते.
ज्या प्रकारचे लायन एअरचे विमान सोमवारी कोसळले, तशाच प्रकारची विमाने जेट एअरवेज आणि स्पाइसजेट या दोन कंपन्यांनीही घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही विमाने कितपत सुरक्षित आहेत, हे पुन्हा एकवार तपासण्याचे डीजीसीएने ठरविले आहे. या दोन कंपन्यांनी बोइंगकडे याआधीच या विमानांची आॅर्डर दिली आहे. विमानाने जकार्तातून उड्डाण केल्यानंतर १३ मिनिटांतच विमान समुद्रात कोसळले. तत्पूर्वी विमान तीन हजार फूट उंचीवर होते. इंडोनेशियातील तपास पथकाला समुद्रातून मंगळवारी मानवी अवशेष मिळाले. एका अहवालात म्हटले आहे की, विमानात एक दिवसापूर्वी तांत्रिक समस्या आली होती. (वृत्तसंस्था)
डीएनए चाचणी होणार
तपास पथकाचे प्रमुख मोहम्मद यांनी सांगितले की, घटनास्थळाहून मानवी अवशेष मिळाले असून, या दहा बॅगमधील अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात येईल. कपडे, बूट, पर्स अशा वस्तूही सापडल्या आहेत. समुद्रावर तरंगणाऱ्या सर्व वस्तू एकत्र करण्यात आल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात १७८ वयस्क, एक मुलगा, दोन बालके, दोन पायलट आणि चालक दलाचे सहा सदस्य होते. यात इंडोनेशिया अर्थ मंत्रालयाचे २० कर्मचारीही होते.