किम जोंग-नाम हत्येप्रकरणी इंडोनेशियन महिलेला अटक
By admin | Published: February 17, 2017 12:51 AM2017-02-17T00:51:06+5:302017-02-17T00:51:06+5:30
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांच्या सावत्र भावाचा मृतदेह मलेशिया परत करणार आहे, असे उपपंतप्रधान अहमद झाहीद
कुआला लुम्पूर : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांच्या सावत्र भावाचा मृतदेह मलेशिया परत करणार आहे, असे उपपंतप्रधान अहमद झाहीद हमिदी यांनी गुरुवारी वार्ताहरांना येथे सांगितले. हत्येप्रकरणी इंडोनेशियाच्या महिलेला अटक झाली.
मृतदेह परत करा, अशी विनंती उत्तर कोरियाने केल्याच्या वृत्ताला हमिदी यांनी दुजोरा दिला. मृतदेह परत करण्यापूर्वीची आवश्यक ती कार्यपद्धती अवलंबिली जाईल, असे ते म्हणाले. कुआला लुम्पूर विमानतळावर सोमवारी जी व्यक्ती ठार झाली ती किम जोंग-नाम (४५) असून किम जोंग-ऊन यांचा तो त्यांच्यापासून वेगळा राहणारा सावत्र भाऊ आहे. मलेशियाने या विषयावरील आपल्या अधिकृत निवेदनात फक्त कोरियन पुरूष एवढाच उल्लेख केला होता. किम हे पासपोर्टवर किम चोल अशा नावाने मलेशियात आल्याचे मानले जाते. किम चोल हे त्यांचे उर्फ नाव होते, असे दक्षिण कोरियाच्या प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर प्रमुखांनी म्हटले आहे की किम जोंग-नाम हे कुआला लुम्पूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मकाऊला जाण्यासाठी विमानाकडे जात असताना त्यांच्यावर उत्तर कोरियातील हस्तकांकडून विष प्रयोग झाला. मलेशियाने बुधवारी नाम यांचे शवविच्छेदन केले. परंतु त्याचा निष्कर्ष जाहीर केलेला नाही. नाम यांच्यावर खरोखर विषप्रयोग झाला का यावर शवविच्छेदनाच्या निष्कर्षांनी प्रकाश पडेल. शवविच्छेदनाला उत्तर कोरियाने आक्षेप घेतला होता. परंतु मलेशियाने शवविच्छेदन केले कारण उत्तर कोरियाने औपचारिक निषेधही दाखल केलेला नव्हता, असे मलेशियाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल समाह मात यांनी सांगितले.