वाऱ्यामुळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:20 AM2021-02-18T03:20:15+5:302021-02-18T06:35:06+5:30
Indonesian woman claims to be pregnant due to wind: या महिलेचे नाव सिती झैना (२५) असून, तिने असाही दावा केला आहे की, गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या दोन तासांतच मी बाळाला जन्म दिला.
जकार्ता : वाऱ्याच्या झोताने गरोदर राहिल्याचा विचित्र दावा इंडोनेशियातील एका महिलेने केला आहे. तेथील पोलीस आता या आगळ्यावेगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेची उदंड चर्चा सुरू आहे.
या महिलेचे नाव सिती झैना (२५) असून, तिने असाही दावा केला आहे की, गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या दोन तासांतच मी बाळाला जन्म दिला. इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतातल्या सिआंजूर या गावी राहणाऱ्या सिती झैना हिने गेल्या आठवड्यात पत्रकारांकडे असा दावा केला की, गेल्या आठवड्यात मी घरी विश्रांती घेत असताना वाऱ्याचा झोत आला व तो गुप्तांगात शिरला. त्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागले व ते आणखी वाढतच गेले. त्यामुळे मी रुग्णालयात धाव घेतली व काही वेळाने एका मुलीला जन्म
दिला.
सितीने केलेल्या विचित्र दाव्याची कहाणी साऱ्या सिआंजूर गावामध्ये पसरली. समाजमाध्यमांवरही या प्रकाराची उदंड चर्चा सुरू झाली. सितीने स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या गर्भारपणाच्या कारणाबद्दलचा विचित्र दावा केला. (वृत्तसंस्था)
गरोदरपणाची लक्षणे जाणवली नसावीत
स्थानिक वैद्यकीय अधिकारी एमान सुलेमान यांनी सांगितले की, सिती व तिला झालेली मुलगी यांची प्रकृती उत्तम आहे. कधी कधी एखाद्या महिलेला ती गरोदर असण्याची प्रारंभिक लक्षणे अजिबात जाणवत नाहीत. त्यामुळे प्रसूती झाल्यानंतर ते सारे काही अचानक घडले असे वाटण्याची शक्यता असते.