नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:57 AM2019-09-02T05:57:47+5:302019-09-02T05:58:30+5:30

दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेक्यांची घुसखोरी : ३०० ते ३५० अतिरेकी एलओसीजवळ दबा धरून बसले

Infiltration efforts increased from the control line jammu and kashmir | नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

googlenewsNext

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सुरक्षा दलाने असे प्रयत्न हाणून पाडले आहेत, अशी माहिती ले. जनरल केजेएस धील्लन यांनी दिली. तथापि, ३०० ते ३५० अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे, तर गत दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धिल्लन यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही. पाकिस्तानने उघडपणे जाहीर केलेले आहे की, काश्मिरींच्या मदतीसाठी आम्ही सर्वकाही करू. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी काश्मिरींना उघड समर्थन दिले आहे. मे आणि जूनमध्ये घुसखोरीत घट झाली होती. कारण, पाकिस्तानला अशी आशा होती की, मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर चर्चेचा मार्ग मोकळा होईल. नियंत्रण रेषेनजीकचे लाँच पॅडही जुलैअखेरीस रिकामे करण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सध्या दररोज किमान १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. (वृत्तसंस्था)

पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर व गावांवर उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात एक जवान शहीद झाला. पूंछ सेक्टरमध्ये शाहपूर-केरनी भागातील सीमेवर ही घटना घडली. पाकने अनेक ठिकाणी गोळीबारही केला. भारताने याला चोख प्रत्युत्तर दिले. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पूंछ व राजौरी जिल्ह्यांचा दौरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे.

पाक म्हणतो, आम्ही चर्चेस तयार

परराष्ट्रमंत्री कुरेशी म्हणाले, भारताने काही अटी मान्य कराव्यात

इस्लामाबाद : काश्मीरमधील नेत्यांशी भेट घेण्याच्या परवानगीसह काही अटी मान्य केल्यास भारताशी पाकिस्तान चर्चा करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नी भारताशी चर्चा करण्यास तसेच त्रयस्थ देशाची मध्यस्थी स्वीकारण्यास पाकिस्तान तयार आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानच्या काही अटी भारताने मान्य करायला हव्यात. ३७० कलम रद्द केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये लागू केलेली संचारबंदी व अन्य निर्बंध भारताने हटविले पाहिजेत. स्थानिक नागरिकांच्या हक्कांची होत असलेली गळचेपी थांबवली पाहिजे. अटक केलेल्या काश्मिरी नेत्यांची भारताने सुटका करावी.
कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेला कधीच नकार दिला नव्हता. मात्र अशा चर्चेसाठी भारतच तयार नसल्याचे जाणवत आहे. भारताने परवानगी दिल्यास काश्मीरी नेत्यांची मी भेट घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे.
काश्मीरी जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या जाणे थांबायला हवे. आखाती देशांचा भारताशी मोठा व्यापार व उत्तम संबंध आहेत. तरीदेखील या देशांनी काश्मीरबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली असल्याचा दावा कुरेशी यांनी केला.

दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता नाही
च्भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी फेटाळून लावली आहे. पाकिस्तानने कधीही आक्रमक पवित्रा घेतला नसून शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असा दावाही त्यांनी केला. मात्र पाकिस्तानवर युद्ध लादले गेल्यास त्याचा सामना करण्यास आमचे लष्कर व जनता समर्थ आहे अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
च्भारताबरोबर असलेल्या मतभेदांवर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढावा अशी पाकिस्तानची भूमिका आहे.

Web Title: Infiltration efforts increased from the control line jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.