पाकिस्तानमध्ये जनता महागाईने त्रस्त, पेट्रोल दरात 8.14 रुपयांची भाववाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 07:30 PM2021-11-06T19:30:35+5:302021-11-06T19:31:42+5:30
पाकिस्तानमध्ये वीजदरातही वाढ करण्यात आली, घरगुती वापरातील वीजदरात 1.68 प्रति युनिट दराने वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच पाकिस्तानात पेट्रोल 8 रुपयांनी महाग झाले आहे.
इस्लामाबाद - भारतात मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे देशात पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. तिकडे, दुसरीकडे पाकिस्तानमध्येही जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशात सतत 5 व्या सप्ताहात महागाईत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सांख्याकी ब्युरोने ताजी आकडेवारी जारी केली असून 4 नोव्हेंबर रोजी समाप्त झालेल्या सप्ताहातही 0.67 टक्के महागाईत वाढ झाली आहे.
पाकिस्तानमध्ये वीजदरातही वाढ करण्यात आली, घरगुती वापरातील वीजदरात 1.68 प्रति युनिट दराने वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच पाकिस्तानात पेट्रोल 8 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे, पाकिस्तानमध्ये पेट्रोल प्रति लिटर 146 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर, साखर 150 रुपये किलो दराने विकली जात आहे. डॉन या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विद्युत ऊर्जा नियामक मंडळाने घरगुती वीज वापरकर्त्या ग्राहकांसाठी वीजदरात 1.68 रुपये प्रति युनिट वाढविले आहे. देशातील खाद्य पदार्थांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली असून गेल्याच आठवड्यात 51 वस्तूंपैकी 28 वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. तर, 20 वस्तूंची किंमत स्थीर आहे.
पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी पेट्रोल दरवाढीवरुन इम्रान खान सरकारवर टीका केली आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत, त्यामुळे पीपीपी म्हणजे पाकिस्तान पिपुल्स पार्टीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पीएमएल-एनचे अध्यक्षांनी पीपीपचे चेअरमन बिलावल भुट्टो यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. तसेच, संसदेत महागाईविरुद्ध आवाज उठवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, इम्रान खान सरकारने गेल्या गुरुवारी पेट्रोलच्या दरात 8.14 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, महागाईत वाढ झाली आहे.