हंगेरीत स्थलांतरितांना अमानुष वागणूक
By admin | Published: September 12, 2015 04:47 AM2015-09-12T04:47:19+5:302015-09-12T04:47:19+5:30
हंगेरीमध्ये सध्या आलेल्या सीरियन नागरिकांना जनावरांप्रमाणे वागविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोस्ज्के येथे असणाऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरितांना
बुडापेस्ट : हंगेरीमध्ये सध्या आलेल्या सीरियन नागरिकांना जनावरांप्रमाणे वागविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोस्ज्के येथे असणाऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरितांना सँडविचची पाकिटे झेलावी लागत आहे. या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक टीकाकारांनी या कॅम्पना कुप्रसिद्ध तुरुंग ग्वांटानामो बे ची उपमा दिली आहे.
एका आॅस्ट्रियन स्वयंसेवकाने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामुळे हंगेरीवर टीका केली जात आहे. दोनच दिवसांपुर्वी एका महिला व्हिडिओग्राफरने लहान मुलगा व त्याच्या वडिलांना लाथ मारुन पाडले होते.
तसेच केलेटी रेल्वेस्थानक आणि सर्बिया-हंगेरी सीमेवर देखिल े बळाचा वापर होत आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे हंगेरी सरकारच्या वर्तनावर चर्चा सुरु झाल्या आहेत. आॅस्ट्रियन महिला स्वयंसेवक मायकेला स्प्रीटझेनडॉर्फ यांनी व्हिडिओ चित्रित केला असून त्यांचे पती अलेक्झांडर यांनी तो यूट्यूबवर प्रसारित केला.
रशियाची मदत सुरूच...... दरम्यान रशियाने सीरियाला आपली मदत चालूच ठेवली आहे. सीरियाला दारुगोळा, युद्धसामुग्री आणि ग्रेनेड लाँचर्स तसेच ट्रक्सची मदत होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोमरसांट या रशियन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी ही मदत मानवी आधारावर करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिका 10,000 निर्वासितांना स्वीकारणार......
अमेरिकेने पुढील वर्षापर्यंत आणखी दहा हजार लोकांना स्वीकारण्याचे निश्चित केले आहे. व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जॉन अर्नेस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले काही महिने अमेरिका प्रशासन निर्वासितांच्या संख्येकडे व युरोपच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. येत्या काळामध्ये प्रशासन या निर्वासितांपैकी काहींना सामावून घेणसाठी प्रयत्न करणार आहे.