हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाला सुरुवात करा; भारताने पाकिस्तानकडे मागणी केल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 13:38 IST2023-12-28T13:35:22+5:302023-12-28T13:38:44+5:30
सईद हा पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे. मोठमोठ्या रॅलींना संबोधित करत आहे. सर्व पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई न करता त्याला संरक्षण पुरवत आहे.

हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाला सुरुवात करा; भारताने पाकिस्तानकडे मागणी केल्याचा दावा
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारताकडे सोपवा अशी मागणी पाकिस्तानकडे करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने केले आहे. सईद हा पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे. मोठमोठ्या रॅलींना संबोधित करत आहे. सर्व पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई न करता त्याला संरक्षण पुरवत आहे. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
भारत सरकारने हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची औपचारिक विनंती पाकिस्तानकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मीडिया इस्लामाबाद पोस्टनेही हा दावा केला आहे. हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती भारताने केल्याची माहिती राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारत सरकारकडून अधिकृत विनंती प्राप्त झाली आहे, असेही त्यात म्हटले आहे.
हाफिज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेनेही त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.
लष्कर-ए-तैयबा (LeT) संस्थापक हाफिज मोहम्मद सईद 2019 पासून तुरुंगात असल्याचे पाकिस्तानकडून भासविण्यात येत आहे. जमात-उद-दावा ही लष्करची दहशतवादी कृत्ये करणारी संघटना आहे. सईदचा पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत उतरणार आहे. हाफिज सईदचा मुलगा लाहोरमधून निवडणूक लढणार आहे. हाफिजचा पक्ष या निवडणुकीत इस्लामिक स्टेटचे स्वप्न दाखवत आहे.