जैन संघटनांचा मदतकार्यात पुढाकार
By admin | Published: May 5, 2015 01:17 AM2015-05-05T01:17:22+5:302015-05-05T01:17:22+5:30
गेल्या ५ दिवसांपासून भारतीय जैन संघटना नेपाळमधील मदतकार्यात पुढाकार घेऊन सक्रियपणे योगदान देत आहेत. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय
काठमांडू : गेल्या ५ दिवसांपासून भारतीय जैन संघटना नेपाळमधील मदतकार्यात पुढाकार घेऊन सक्रियपणे योगदान देत आहेत. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे पथक भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहे.
अन्न पुरवणे तसेच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी भारतीय जैन संघटना सक्रियपणे काम करीत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २००१ मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपावेळीही मदतकार्यात भारतीय जैन संघटनेने भरीव कार्य केले होते.
पुण्यातील विख्यात डॉक्टर डॉ. के. एच. संचेती हे सुद्धा लवकरच नेपाळमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी काळात पावसाळ््यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याचे आव्हानात्मक काम भारतीय जैन संघटना हाती घेणार आहे. भूकंपामध्ये अनेक आरोग्य केंद्रे जमीनदोस्त झाली आहेत. पावसाळ््यापूर्वी शक्य तेवढ्या आरोग्य केंद्रांची उभारणी होणे आवश्यक आहे अन्यथा नेपाळला मोठ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा नेपाळमधून ५ मे रोजी दिल्लीला परतत असून नेपाळच्या राजदूताशी त्यांची भेट होणार आहे.
भारतीय जैन संघटना सध्या नेपाळमध्ये करीत असलेल्या कार्याबद्दल तसेच भविष्यातील कामासंदर्भात या वेळी दोघांमध्ये चर्चा होणार आहे.