जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 19:25 IST2024-12-09T19:23:57+5:302024-12-09T19:25:42+5:30

INS Tushil, Russia India relations: आयएनएस तुशिल हे रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीचे उत्तम मिश्रण आहे.

INS Tushil Rajnath Singh commissions Indian Navy new frigate in Russia to increase naval power | जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार!

जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार!

INS Tushil, Russia India relations : एकीकडे रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. पण दुसरीकडे भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होताना दिसत आहे. रशियात बांधणी करण्यात आलेली आयएनएस तुशिल ही शक्तिशाली युद्धनौका आज (सोमवारी) रशियाने भारताला सुपूर्द केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे रशियन बनावटीच्या आणि स्वदेशी क्षेपणास्त्रांसह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज युद्धनौका INS तुशिल कार्यान्वित करताना उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नौदल प्रमुखांसह रविवारी रात्री उशिरा मॉस्कोला पोहोचले. ते मंगळवारी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यासोबत तांत्रिक सहकार्यावरील बैठकीत सहभाग घेतील. याशिवाय ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

INS तुशिल या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची सामरिक ताकद आणखी वाढणार आहे. INS तुशिलचे वजन ३९०० टन आहे. त्याच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, ही युद्धनौका १२५ मीटर लांब आहे. ही युद्धनौका शत्रूंवर प्राणघातक हल्ल्यासाठी ओळखली जाते. आयएनएस तुशिल हे रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीचे उत्तम मिश्रण आहे.

आयएनएस तुशिल किती शक्तिशाली?

सोमवारी भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या या शक्तिशाली युद्धनौकेवर १८ अधिकारी आणि १८० सैनिक असतील. ते ३० दिवस समुद्रात राहू शकतात. त्यात प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि २४ मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. ही युद्धनौका जास्तीत जास्त ५९ किमी/तास वेगाने धावू शकते.

संरक्षण मंत्री ३ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ८ ते १० डिसेंबर दरम्यान रशिया दौऱ्यावर आहे. यावेळी ते भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. त्यांनी सोमवारी आयएनएस तुशिल ला भारतीय नौदलात दाखल केले. याशिवाय मंगळवारी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑक्टोबरमध्ये रशियाला गेले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी क्रेमलिनने आपल्या निवेदनात म्हटले होते की, पुतिन यांच्या भारत भेटीची तयारी सुरू झाली असून लवकरच तारखा जाहीर केल्या जातील.

Web Title: INS Tushil Rajnath Singh commissions Indian Navy new frigate in Russia to increase naval power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.