वर्णव्देषाची झळ सोसणा-या 'तिला' मोहम्मद अलीच्या विचारांनी दिली प्रेरणा
By Admin | Published: June 16, 2016 05:41 PM2016-06-16T17:41:28+5:302016-06-16T17:41:28+5:30
१९ वर्षाची नताशा मोहम्मद अलींना प्रत्यक्षात कधीही भेटली नाही. पण त्यांच्या विचारांनी नताशाला लढण्याचे बळ दिले.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १६ - आपल्या जोरदार ठोशांनी काही मिनिटात समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर लोळवणा-या मोहम्मद अली यांनी चार जूनला जगाचा निरोप घेतला. जगप्रसिद्ध बॉक्सर एवढीच अली यांची मर्यादीत ओळख नाही. आपल्या ठोशांनी रिंग गाजवत असताना अली यांना अमेरिकेत वर्णव्देषाच्या वाईट अनुभवातूनही जावे लागले.
त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर, खचून गेला असता. पण अली यांनी परिस्थितीशी लढा दिला. आपल्यासारखा अनुभव दुस-या कोणाच्या वाटयाला आला तर, त्याला उभे रहाता यावे यासाठी मोहम्मद अली सेंटरची स्थापना केली. याच सेंटरच्या आधाराने आत्मविश्वास मिळालेल्या नताशा मुंदकूरला मोहम्मद अलीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी बोलण्याची संधी मिळाली.
१९ वर्षाची नताशा मोहम्मद अलींना प्रत्यक्षात कधीही भेटली नाही. पण त्यांच्या विचारांनी नताशाला लढण्याचे बळ दिले. मला दहशतवादी ठरवून मायदेशात जाण्यास सांगितले होते. पण मोहम्मद अली यांच्या विचारावर चालणा-या केंद्राने मला बळ दिले. मोहम्मद अलींकडे जो विश्वास होता तो माझ्याकडे नव्हता. काही जण त्यांना लढवय्ये म्हणून ओळखतात. काही मानवतावादी तर, काही त्यांना ग्रेटेस्ट म्हणतात. पण मी दोन शब्दात निस्वार्थी प्रामाणिक असे मोहम्मद अलींचे वर्णन करीन असे याप्रसंगी नताशा म्हणाली.
नताशाला वर्गात तिच्या वर्णावरुन लक्ष्य करण्यात येत होते. मला बोलण्याचीही भिती वाटायची. पण एकदिवस वर्गात इतिहासाच्या तासाला मोहम्मद अलींची कथा शिकवली आणि आपल्याला नवा विचार मिळाला असे नताशाने सांगितले. नताशा इंटरनॅशनल बिझनेस आणि पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेत आहे. मोहम्मद अलींनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरुन मी चालणार आहे असे तिने सांगितले.