मुलींऐवजी मुलंच शाळेत घालून गेली शॉर्ट स्कर्ट
By admin | Published: June 23, 2017 03:14 PM2017-06-23T15:14:58+5:302017-06-23T15:14:58+5:30
डेवोन शहरातील तीस मुलं चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत जाताना दिसली.
Next
ऑनलाइन लोकमत
डेवोन, दि. 23- आपण नेहमीच मुलींना शाळेमध्ये स्कर्ट आणि फ्रॉक घालून जाताना पाहतो. पण इंग्लंडमध्ये विरूद्ध चित्र गुरूवारी सकाळी तेथिल नागरीकांनी बघितलं. तेथे असलेल्या डेवोन शहरातील तीस मुलं चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत जाताना दिसली. शहरात असलेल्या इस्का अकॅडमीमध्ये गुरूवारी सकाळी 30 मुलांनी चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत प्रवेश केला. तेथिल वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे या विद्यार्थ्यांनी फुल पँटऐवजी हाफ पँट वापरायची परवानगी द्या, अशी मागणी शाळा प्रशासनाकडे केली होती पण शाळेच्या गणवेशाबाबतच्या नियमांमध्ये हाफ पँट वापरायचा नियम नाही, असं सांगत विद्यार्थ्यांची ही मागणी अमान्य करण्यात आली. यानंतर शॉर्ट स्कर्ट असलेला गणवेश मुलींना कसा चालतो, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केल्यावर तुम्हाला स्कर्ट घालण्यापासून कोणी रोखलं नाही, असं गमतीशीर उत्तर शाळेकडून देण्यात आलं होतं. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी या मुलांनी शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत प्रवेश केला. द गार्डीयन या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
डेवोनमध्ये या आठवड्यात 30 अंशाच्या वर तापमानाचा पारा गेला होता. वाढत्या गर्मीमुळे फुल पँट घालून वर्गात बसणं शक्य नसल्याने मुलांनी हाफ पँट वापरण्याची परवानगी मागितली होती. पण हाफ पँट वापरणं नियमात बसत नाही, असं या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं. शाळेमध्ये स्कर्ट घालून यायची युक्ती आम्हाला मुख्यध्यापकांमुळेच मिळाली, असं त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्यांने सांगितलं. आमच्या या कृतीमुळे फुल पँटची सक्ती असणारा निर्णय शाळा लवकरच बदलेल तसे संकेत मुख्याध्यापकांनी दिले आहेत, असंही या मुलांनी सांगितलं आहे.
यंदाचं तापमान जास्त आहे याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळेच शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आरामात शाळेत बसता येइल या दृष्टीने आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असं शाळेच्या मुख्याध्यापिका अॅमी मिशेल यांनी सांगितलं आहे. तर शाळेच्या निर्णयाविरोधात मुलांनी आवाज उठवला आणि त्यांची बाजू शाळेसमोर ठेवली याचा आम्हाला अभिमान असल्याचं मत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केलं आहे.
भेदभाव केलेला विद्यार्थ्यांनाही आवडत नाही. शाळेतील शिक्षिका सँडल्स आणि स्कर्ट वापरतात पण मुलांना मात्र फुल पँट, शूज आणि ब्लेझर वापरावं लागतं. हे अयोग्य असून मुलं हाफ पँट का वापरू शकत नाही, असं मत एका विद्यार्थ्याच्या पालकाने व्यक्त केलं आहे.