अमेरिकेत केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांवरून तीव्र संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:31 AM2020-04-16T05:31:25+5:302020-04-16T05:32:05+5:30

राष्ट्राध्यक्ष व गव्हर्नरांमध्ये शाब्दिक हमरीतुमरी; राज्ये स्वायत्ततेबद्दल ठाम

Intense conflict over rights in the United States in the Central and States | अमेरिकेत केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांवरून तीव्र संघर्ष

अमेरिकेत केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांवरून तीव्र संघर्ष

Next

वॉशिंग्टन : अमेरिका या जगातील सर्वात बलाढ्य व पुढारलेल्या देशात हाहाकार उडविणाऱ्या कोरोना विषाणूच्या साथीने सुमारे २६ हजार नागरिकांचे प्राण गेलेले व आणखी किमान ६ लाख लोक या विषाणूचा संसर्ग होऊन आजारी पडले असताना तेथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व विविध राज्यांचे गव्हर्नर यांच्यात अधिकारांवरून जोरदार भांडण जुंपले आहे.

कोरोना महामारीचे संकट हाताबाहेर जाऊन टीका होऊ लागल्यावर ‘ही राज्यांची जबाबदारी आहे’ असे सांगणाºया ट्रम्प यांची भाषा अचानक बदलली असून, आता ते ‘अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा शब्द अंतिम असतो त्यांच्या संमतीशिवाय राज्ये काही करू शकत नाहीत’, असे सांगून राज्यांना उद्देशून अरेरावीची भाषा करू लागले आहेत. यातून, सर्व देशाने एकदिलाने कोरोनाविरुद्ध लढण्याची गरज असताना, संघीय सरकार व घटक राज्यांमध्ये अधिकारांवरून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. अमेरिका हे संघराज्य असले तरी येथे काही मोजक्याच बाबींमध्ये संघीय सरकारला निर्णायक अधिकार असून, राज्ये आपापल्या हद्दीत कारभार कसा करायचा हे ठरवायला पूर्णपणे स्वायत्त आहेत.
राज्यांवर अधिकार गाजविण्यासाठी ट्रम्प राज्यघटनेचे दाखले देत असले तरी प्रकरण न्यायालयात गेले, तर ते सपशेल तोंडघशी पडतील, असे अनेक घटनातज्ज्ञांचे मत आहे. 

इतरही अनेक देशांप्रमाणे अमेरिकी अर्थव्यवस्था कोरोनाच्या या संकटाने जेरीस आली आहे. सहा कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. एरवीही दारिद्र्य पाचवीला पुजलेले हजारो नागरिक अन्नाला महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत देशात लागू केलेले कडक निर्बंध सुरू ठेवावेत की, शिथिल करावेत, यावरून हे अधिकारांचे भांडण जुंपले आहे. या भांडणाला डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन, अशी चिरंतन पक्षीय मतभेदांचीही किनार आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पाच महिन्यांवर आल्याने या मतभेदांना आणखी धार चढली आहे.

निर्बंध शिथिल करण्यास ट्रम्प आतुर झाले आहेत व ते आपला आतताईपणा राज्यांवर थोपवू पाहत आहेत. कोरोनाची झळ सर्वात जास्त पोहोचलेल्या कनेक्टिकट, डेलावेर, मॅसॅच्युसेटस्, न्यूजर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्वेनिया व ºहोड आयलंड या ईशान्येकडील सात राज्यांच्या गव्हर्नरांनी निर्बंध कधी व कसे शिथिल करायचे हे समन्वयाने ठरविण्यासाठी आघाडी स्थापन केली आहे.

कॅलिफोर्निया, आरोगॉन व वॉशिंग्टन या अन्य तीन राज्यांनीही अशीच युती केली; परंतु यापैकी बहुतांश राज्यांचे गव्हर्नर डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्याने रिपब्लिकन असलेल्या ट्रम्प यांना राज्यांचा केंद्राविरुद्ध कट शिजत असल्याचा वास येत आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या इशाºयावर चालते. आताच्या यावेळी मला ‘म्युटिनी आॅन बाऊंटी’ या जुन्या अप्रतिम चित्रपटाची आठवण येते. त्यात जहाजाच्या कप्तानाविरुद्ध उठाव करू पाहणाºया नाविकांची काय अवस्था झाली होती, याचे बंडाचे निशाण उभारणाºया डेमोक्रॅटिक गव्हर्नरांनी भान ठेवावे.
-डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

ट्रम्प यांनी कितीही शाब्दिक बॉम्बगोळे फेकले तरी आम्ही हाती घेतलेल्या चांगल्या कामापासून जराही विचलित होणार नाही.
-नेड लेमॉन्ट, गव्हर्नर, कनेक्टिकट राज्य

अमेरिका कोण्या लहरी राजाचे नाही, तर जबाबदार राष्ट्राध्यक्षाचे ऐकते. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा आपला विचार राज्यांच्या गळी उतरविण्याची बळजबरी ट्रम्प यांनी केली, तर त्यातून न भूतो असा घटनात्मक पेच उभा राहील.
-अ‍ॅण्ड्र्यू क्युमेओ,
गव्हर्नर, न्यूयॉर्क राज्य

Web Title: Intense conflict over rights in the United States in the Central and States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.