मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:32 AM2019-09-26T02:32:56+5:302019-09-26T06:54:42+5:30

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच

The international community is under no pressure from Modi | मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

Next

न्यूयॉर्क : काश्मीरमध्ये भारताने चालविलेले अत्याचार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय दबाव आणताना दिसत नाही. ही स्थिती पाहून आपण निराश झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या येथे आयोजिण्यात आलेल्या आमसभेला उपस्थित राहाण्यासाठी इम्रान खान आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून तिथे संचारबंदी व अन्य निर्बंध लागू करण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला यांच्यासह काही महत्त्वाचे नेते व फुटीरतावादी नेते, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

भारत काश्मिरी जनतेच्या हक्कांची गळचेपी करीत असल्याच्या पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने अजिबात महत्त्व दिले नाही. तरीही पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. ऐंशी लाखांपेक्षा जास्त ज्यू किंवा अगदी आठ अमेरिकी लोकांना जर कोंडून ठेवले असते, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरबाबत घेतली आहे, तशीच भूमिका त्यावेळी घेतली असती का, असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील निर्बंध हटवावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणलेला नाही. असे असले तरी काश्मीरमधील परिस्थितीचा मुद्दा पाकिस्तान यापुढेही मांडतच राहाणार. काश्मीरमध्ये ९० हजार सैनिक तैनात करण्याचे कारणच काय? संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आली की, काश्मीरमध्ये नेमके काय होणार आहे, हे देवालाच ठाऊक, असेही इम्रान खान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

काश्मिरी निमूटपणे निर्णय मान्य करतील?
काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय तेथील लोक निमूटपणे मान्य करतील, असे वाटते काय, असे चिथावणीखोर उद्गारदेखील इम्रान यांनी काढले आहेत.
ते म्हणाले की, भारताची मोठी बाजारपेठ व आर्थिक क्षमता यांच्याकडे पाहून जगातील अनेक देश काश्मीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
काश्मीरबाबत पाकिस्तान करीत असलेल्या वक्तव्यांना आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्व देत नाही, अशी खंतही इम्रान खान यांनी व्यक्त केली.

Web Title: The international community is under no pressure from Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.