परीक्षेच्या काळात इंटरनेट सेवाच केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:14 AM2018-06-22T04:14:24+5:302018-06-22T04:14:24+5:30
विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केल्याच्या घटना भारतात सर्रास घडत असतात. त्याच्या बातम्यांचेही आता कोणाला आश्चर्य वाटत नाही.
अल्जियर्स : विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केल्याच्या घटना भारतात सर्रास घडत असतात. त्याच्या बातम्यांचेही आता कोणाला आश्चर्य वाटत नाही. पण जगात एक असाही देश आहे की, जिथे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण देशातच इंटरनेट बंद करण्यात आले.
अल्जेरियामध्ये बुधवारपासून हायस्कूल विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथे कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी देशभरातील इंटरनेट सेवाच बंद करण्यात आली. परीक्षांचा पेपर होता दोन तासांचा; पण त्यासाठी देशात मोबाइल वा फिक्स्ड इंटरनेटची सेवा ठप्प होती. सरकारच्या आदेशानंतरच इंटरनेट सेवा थांबविण्यात आली, असे अल्जिरी टेलिकॉमने जाहीर केले आहे.
देशात हायस्कूलमधील परीक्षा सुरू राहतील, तोपर्यंत ७ लाख विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
या परीक्षा येत्या सोमवारपर्यंत सुरू असतील. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली अल्जेरियामध्ये येथे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात कॉपी केली होती. त्या वेळी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न परीक्षेच्या आधीच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.
>लोकांनी केला नाही विरोध
त्यानंतर गेल्या वर्षीपासून अल्जेरियातील सरकारने सरकारने परीक्षेच्या काळात सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या सूचना आॅपरेटर्सना दिल्या होत्या; पण तेवढे करूनही प्रश्न सुटलाच नाही. त्यामुळे यावर्षी परीक्षेच्या काळात देशातील इंटरनेट सेवाच बंद करण्याचा सरकारने घेतला. याला पालकांनी विरोध केला नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रश्नच नव्हता. अनेकांना या निर्णयाचा त्रास निश्चितच झाला. मात्र, त्याबद्दल फारशी कटकट झाली नाही.