अमेरिकेत असहिष्णूता शिगेला, डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ११ टक्क्यांनी वाढली
By admin | Published: December 19, 2015 04:31 PM2015-12-19T16:31:52+5:302015-12-19T16:31:52+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांची लोकप्रियता तब्बल ११ टक्क्यांनी वाढून ३९ टक्क्यांच्या घरात पोचल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - अमेरिकेचे दरवाजे बाहेरच्या देशातल्या मुस्लीमांसाठी काही काळासाठी बंद करावेत असा वादग्रस्त तोडगा दहशतवादाशी लढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला होता. जगभरातून जरी ट्रम्प यांना टिकेला तोंड द्यावे लागले असले तरी मधल्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या लोकप्रियतेचे रेटिंग तब्बल ११ टक्क्यांनी वाढून ३९ टक्क्यांच्या घरात पोचल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर नक्की काय चाललंय आणि आपण कुठे आहोत हेच समजत नसून, सगळ्या गोष्टी स्पष्ट होईपर्यंत मुस्लीमांच्या अमेरिकाप्रवेशावर बंदी घालण्याची योजना ट्रम्प यांनी मांडली होती. या उद्गारांचा वारंवार पुनरुच्चार करणा-या ट्रम्प यांचा जगभरातील विद्वज्जनांनी धिक्कार केला. असहिष्णूतेचे प्रतिबिंब ट्रम्प यांच्या विचारात उमटल्याचीही टीका झाली. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे या विधानांनी त्यांची लोकप्रियता वाढल्याचेच दिसत आहे. त्यांच्या खालोखाल लोकप्रिय असलेले दुसरे उमेदवार टेड क्रूझ असून त्यांचे रेटिंग अवघे १८ टक्के आहे, तर मार्को रुबियो व बेन कार्सन अनुक्रमे ११ व ९ टक्क्यांवर आहेत.
तर अन्य एका पोलनुसार ट्रम्प ३४ टक्के रिपब्लिकन्सचा ट्रम्पना पाठिंबा आहे, आणि टेड क्रूझ (१८ टक्के), रुबियो (१३ टक्के) व जेब बुश (७ टक्के) पिछाडीवर आहेत.
तर रिअलक्लिअर पॉलिटिक्स डॉट कॉमच्या पाहणीनुसाप लोकप्रियतेची टक्केवारी ट्रम्प (३३.८ टक्के), क्रूझ (१६.६ टक्के), रुबियो (१२.४ टक्के), कार्सन (११ टक्के) आणि बुश (४.२ टक्के) अशी आहे.
सगळ्या पाहण्यांमध्ये मुस्लीमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणारे ट्रम्प आघाडीवर असल्यामुळे अमेरिकेतील मुस्लीमांची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे.