तापमानवाढ रोखणारा पॅरिस मसुदा सादर
By admin | Published: December 13, 2015 01:50 AM2015-12-13T01:50:34+5:302015-12-13T01:50:34+5:30
तापमानवाढ रोखून वसुंधरेला वाचविण्यासाठी व जगातील जीवाश्म इंधन वापरणाऱ्या देशांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने येत्या दशकात करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव
पॅरिस : तापमानवाढ रोखून वसुंधरेला वाचविण्यासाठी व जगातील जीवाश्म इंधन वापरणाऱ्या देशांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने येत्या दशकात करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव असलेला अंतिम करार फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबियस यांनी सदस्य राष्ट्रांसमोर शनिवारी सादर केला. त्यामुळे गेले बारा दिवस येथे चालू असलेली हवामान बदल परिषद यशस्वी व ऐतिहासिक झाल्याचे मानले जात आहे.
सर्वाधिक तापमानाचे वर्ष असलेले २०१५ अंतिम टप्प्यात असताना गेली चार वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने चाललेले प्रयत्न आज मसुद्यावर सहमती झाल्याने सफल झाले. फॅबियस यांनी सर्व सदस्य राष्ट्रांना या करारास पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले. ते म्हणाले की, इतिहासाप्रती आपली बांधिलकी महत्त्वाची असून आपण ती जपली पाहिजे. परिषदेच्या मुख्य दालनात यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस होलांद, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी उपस्थित होते.
पृथ्वीच्या तापमानवाढीने भविष्यात होणारे गंभीर परिणाम थांबविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची रूपरेषा या परिषदेत ठरविण्यात आली.
भारताने उपस्थित केलेल्या बहुतेक मुद्यांचे समाधान अंतिम मसुद्यात करण्यात आल्याबद्दल केंद्रिय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले. (वृत्तसंस्था)