भारतात गुंतवणूक करा!
By admin | Published: June 27, 2017 12:27 AM2017-06-27T00:27:23+5:302017-06-27T00:27:23+5:30
व्यापारासाठी अनुकूल देश म्हणून भारत पुढे येत आहे. अमेरिकी कंपन्यातील सीईओंनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन
वॉशिंग्टन : व्यापारासाठी अनुकूल देश म्हणून भारत पुढे येत आहे. अमेरिकी कंपन्यातील सीईओंनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पुढील महिन्यात लागू होत असलेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) निर्णय क्रांतिकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील प्रमुख २० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, गत तीन वर्षांत आमच्या सरकारने सर्वाधिक विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळविली आहे. या बैठकीला अॅपलचे टिम कुक, गुगलचे सुंदर पिचाई, सिस्कोचे जॉन चेंबर्स आणि अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांची उपस्थिती होती. गत तीन वर्षांत सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांची माहिती मोदी यांनी दिली. सरकारने अशा सात हजार सुधारणा केल्याचे सांगून ते म्हणाले की, व्यापारासाठी अनुकूल वातावरण बनविणे हा त्यामागचा उद्देश आहे.
तब्बल ९० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मोदी यांनी टिष्ट्वट केले की, भारतातील भविष्यातील संधीबाबत सीईओंशी चर्चा केली. देशातील तरुण पिढी आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे जगाचे लक्ष आता भारतातील अर्थव्यवस्था, निर्मिती, व्यापार, वाणिज्य आणि जनतेच्या संपर्कावर केंद्रित आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन टिष्ट्वट केले की, संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. मोदी यांनी कंपनीच्या प्रमुखांना सांगितले की, भारताची वृद्धी दोन्ही देशांसाठी फायद्याची आहे. यात योगदान देण्याची संधी अमेरिकी
कंपन्यांसमोर आहे. जीएसटीबाबत ते म्हणाले की, जीएसटी लागू
करण्याचा ऐतिहासिक निर्णय अमेरिकेच्या बिझनेस स्कूलमध्ये अध्ययनाचा विषय होऊ शकतो. विलार्ड हॉटेलमध्ये या चर्चेच्या
दरम्यान मोदी यांनी कंपनीप्रमुखांची मते जाणून घेतली. ५०० रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हॉटेल विकसित करण्याच्या संधीबाबतही मोदी यांनी चर्चा केली. अमेरिकी कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ व सरकारच्या अन्य महत्त्वपूर्ण कार्यक्रमास सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
समजलेल्या माहितीनुसार, अॅपलचे टिम कुक यांनी मोदी यांना बंगळुरुतील आयफोनच्या उत्पादनाबाबत माहिती दिली होती. भारतात या तंत्रज्ञानाशी संबंधित ७,४०,००० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या अॅप डेव्हलपर्सनी एक लाख अॅप्स तयार केले आहेत.
या बैठकीनंतर बोलताना सुंदर पिचाई म्हणाले की, आपण भारतातील गुंतवणुकीबाबत उत्साहित आहोत. गत तीन वर्षांत भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले.
जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत अमेरिकी कंपन्यांचा कल सकारात्मक आहे, असेही ते म्हणाले.