चीनसोबतच्या गुंतवणूक करारांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:32 AM2020-10-01T02:32:27+5:302020-10-01T02:32:55+5:30
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’वर जोर देतानाच आमच्या काही शेजाऱ्यांच्या गुंतवणुकीची छाननी करीत आहोत.
नवी दिल्ली : चीननेभारतात केलेले खासगी क्षेत्रातील सर्व नवे व जुने भागिदारी करार तसेच गुंतवणूक करार यांची चौकशी करण्याचा विचार भारत सरकार करीत आहे. या करारांत कर कायदे आणि इतर कायद्यांचे उल्लंघन तर झालेले नाही ना, याचा तपास यात केला जाणार आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, प्रथमत: तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांचे दस्तावेज आणि करार यांची छाननी करण्यात येणार आहे. योग्य वेळी सर्व रणनीतिक आणि बिगर रणनीतिक क्षेत्रात छाननीचा विस्तार करण्यात येईल. चीन विविध कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय उद्योगांमध्ये गुंतवणूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’वर जोर देतानाच आमच्या काही शेजाऱ्यांच्या गुंतवणुकीची छाननी करीत आहोत. संधिसाधू अधिग्रहणास परवानगी न देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी या छाननीपासून दूर पळण्याचे कारण नाही.