इराण : विमान कोसळून ३८ प्रवासी ठार

By admin | Published: August 11, 2014 01:28 AM2014-08-11T01:28:21+5:302014-08-11T01:28:21+5:30

इराणमध्ये रविवारी प्रवासी विमान कोसळून ३८ जण ठार झाले. विमानाने तेहरान येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात ते दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने जमिनीवरील भीषण प्राणहानी थोडक्यात टळली.

Iran: 38 pilgrims killed in plane crash | इराण : विमान कोसळून ३८ प्रवासी ठार

इराण : विमान कोसळून ३८ प्रवासी ठार

Next

तेहरान : इराणमध्ये रविवारी प्रवासी विमान कोसळून ३८ जण ठार झाले. विमानाने तेहरान येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात ते दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने जमिनीवरील भीषण प्राणहानी थोडक्यात टळली.
हे विमान तबास शहराकडे जात होते. मेहराबाद येथील विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ते आझादी भागात एका लष्करी वसाहतीजवळ कोसळले. विमानातील ३८ जण मारले गेले आहेत, असे एका अग्निशमन कर्मचाऱ्याने इरणा या वृत्तसंस्थेला सांगितले.
सेपाहन एअरलाईनच्या या विमानात सहा मुलांसह ३२ प्रवासी आणि आठ विमान कर्मचारी होते, असे इराणचे उप वाहतूकमंत्री अहमद मजिदी यांनी सांगितले. विमानाच्या अवशेषांमधून काळा धूर बाहेर पडत होता. हे विमान बाजारपेठेजवळील एक भिंत आणि झाडावर आदळले.
‘घटनास्थळी अत्यंत भीषण दृश्य होते. आम्ही सुदैवी आहोत. कारण, दुर्घटनास्थळावरून केवळ ५०० मीटरवर बाजारपेठ आहे. दुर्घटना झाली तेव्हा बाजारपेठेत गर्दी होती. हे विमान जर तेथे कोसळले असते तर काय झाले असते या कल्पनेनेच काळजात धस्स होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, मी दुचाकीवरून जात होतो, तेव्हा पाठीमागून आवाज आला. मी दुचाकी वळविली आणि पाहतो तर पाठीमागे विमान. विमान अगदी जवळ असल्याने मी दुचाकीवरून उतरलो.
इराणच्या नागरी उड्डयन प्राधिकरणचे प्रमुख अलीरेझा जहाँगिरीयन म्हणाले की, हे विमान झाडात कोसळले. जमिनीवर कोणतीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान, विमान दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Iran: 38 pilgrims killed in plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.