इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:06 PM2024-10-04T17:06:34+5:302024-10-04T17:08:13+5:30

नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही.

iran begins investigation into israeli mossad agents in the country, ayatollah khamenei | इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 

इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या चार दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. 

दरम्यान, इस्रायल नसराल्लाहच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचला कसा? असा प्रश्न इराण पडला. त्यानंतर इराणचा संशय बळावला तेव्हा हे प्रकरण मोसादच्या एजंटांपर्यंत पोहोचले. हिजबुल्लाहमध्ये मोसादचे अनेक एजंट असल्याची माहिती इराणला मिळाली. तसेच, इराणमध्येही अनेक वरिष्ठ सरकारी पदांवर मोसादचे एजंट तैनात असल्याचे तपासात समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये भीतीचे वातावरण आहे. नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही.

इराणकडून तपास सुरू 
इराणने आता इस्रायली एजंटची चौकशी सुरू केली आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, रिव्होल्युशनरी गार्डपासून वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जात आहे. परदेशात जाणारे अधिकारी आणि ज्यांचे कुटुंबीय परदेशात राहतात त्यांची प्रथम तपासणी केली जात आहे.

इराणचा कोणावर आहे संशय?
रिव्होल्युशनरी गार्डचे काही अधिकारी लेबनॉनला जात असल्याबद्दल इराणला संशय आहे. यातील एका अधिकाऱ्याने नसराल्लाहचा ठावठिकाणा विचारला होता. इराणने या अधिकाऱ्यासह अन्य काही संशयितांना अटक केली आहे. मात्र, त्याचे संपूर्ण कुटुंब इराणमधून पळून जाण्यात यशस्वी झाले.

इराण आणि हिजबुल्लाह यांच्यात अविश्वास निर्माण 
अन्य एका इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, नसराल्लाह याच्या हत्येनंतर इराण आणि हिजबुल्लाह यांच्यात अविश्वास निर्माण झाला आहे. दुसरीकडे, इराणच्या सत्ता स्थापनेच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली आहे की, सर्वोच्च नेते आता कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.

'या' दोन हत्यांनी इराणला बसला धक्का 
या वर्षी जुलैमध्ये हिजबुल्लाहचा कमांडर फुआद शुकर लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये एका गुप्त ठिकाणी लपून बसला होता. पण अचूक गुप्तचरांच्या आधारे इस्रायलने त्याला हवाई हल्ल्यात ठार केले. त्याच्या हत्येनंतर काही तासांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली. या दोन हत्येनंतर मोसादचे एजंट आतमध्ये घुसल्याचे हिजबुल्लाह आणि इराणला समजले. त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

Web Title: iran begins investigation into israeli mossad agents in the country, ayatollah khamenei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.