पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:46 PM2021-02-04T19:46:35+5:302021-02-04T19:48:41+5:30
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी ईराणनं केली कारवाई
दहशतवाद्यांचं घर झालेल्या पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भारतानं नव्हे तर इराणनंपाकिस्तानच्या आत शिरून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तसंच त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन सैनिकांनाही त्यांनी मुक्त केलं. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण हा तिसरा देश आहे. यापूर्वी भारत आणि अमेरिकेनंही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करत कारवाई केली होती. मंगळवारी रात्री इराणनं सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत दशतवाद्यांना कव्हर देणारे पाकिस्तानचे काही सैनिकही ठार झाले.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनं (IRGC) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पाकिस्तानच्या सीमेतर आतवर शिरून हा सर्जिकल स्ट्राईक केला. तसंच त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असेलल्या आपल्या दोन सैनिकांनाही सोडवलं. पाकिस्ताननं अवैधरित्या कब्जा केलेल्या बलुचिस्तानमध्ये शिरून जैश-अल-अदलच्या ताब्यात असेलेल्या आपल्या सैनिकांना सोडवलं असल्याची माहिती IRGC नं दिली.
IRGC नं यासंदर्भात एक अधिकृत माहिती देत या कारवाईला दुजोरा दिला. "आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाकिस्तानच्या आत शिरून आपल्या सैनिकांना सोडवलं आहे. दहशतवादी संघटनांकडून सैनिकांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर याविरोधात मंगळवारी कारवाई करण्यात आली," असं IRGC कडून सांगण्यात आलं.
जैश उल-अदल अथवा जैश अल-अदल ही दशतवादी संघटना दक्षिण पूर्व इराणमध्ये सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेनं यापूर्वी इराणमध्ये नागरी परिसरात आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले होते. याव्यतिरिक्त बलुचिस्तानमधील नागरिकांच्या नरसंहारासाठी त्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनही समर्थन मिळतं. IRGC च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी ईराणच्या जवानांचं २०१८ मध्ये अपहरण केलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. परंतु आता सर्जिकल स्ट्राईकद्वारे त्यांना सोडवण्यात आलं आहे.