इराणनं बंद केला 'तो' मार्ग तर पूर्ण जगात जाणवेल तेलाचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:53 PM2019-05-15T17:53:20+5:302019-05-15T18:09:45+5:30
इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
तेहरानः इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियानंही त्यांच्या दोन तेलाच्या टँकरना टार्गेट करण्यात आल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीनंही जहाजांवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांचा रोख हा साहजिकच इराणकडे आहे. परंतु इराणनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिका आणि इराणदरम्यान जेव्हा जेव्हा वातावरण बिघडलं, तेव्हा तेव्हा इराणच्या समुद्र खाडीत गंभीर परिणाम झाले आहेत. ज्याचा प्रभाव पूर्ण जगावर जाणवला आहे. इराणनं आधीच इशारा दिला आहे की, जर अमेरिकेबरोबरचा तणाव आणखी वाढल्यास जगातली सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इतर वाहतुकीसाठी बंद करून टाकेल. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराण वारंवार जोर देतो, कारण या सामुद्रधुनीमार्गे जगभरात तेलाचा पुरवठा होतो, ही वाहिनी बंद झाल्यास त्याचा सरळ सरळ प्रभाव तेल व्यापारावर पडणार आहे. जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास जगभरात तेलासाठी हाहाकार माजेल. कारण सौदी अरब, UAE, कुवैत, कतार आणि इराणची जास्त करून तेल निर्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीद्वारे होते. आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी ही एक अरुंद सामुद्रधुनी आहे.
इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती व ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत. ह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे दिवसाला कमीत कमी 15 मिलियन बॅरल्स तेलाचा पुरवठा होतो. जर ही सामुद्रधुनी बंद झाली, तर यूएस, यूकेसह अनेक देशांत तेलाचा तुटवडा भासेल. तेलाच्या किमती वाढतील. खाडी देशांतील संबंध बिघडतील. जर इराण आणि अमेरिकेचे संबंध आणखी बिघडले तर भारत आणि चीनच्या अडचणीही वाढणार आहेत. इराणकडून तेल आयात करण्यावर अमेरिकेनं भारताला सूट दिली असून, ती लवकरच संपणार आहे. तसेच ऊर्जा सुरक्षेसंबंधीची आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळेच भारत-चीनसह अनेक देशांतील अर्थव्यवस्था सुस्त पडल्या आहेत.