'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST2024-11-14T18:19:32+5:302024-11-14T18:20:09+5:30
न्यायालयीन व्यवस्थेवर सत्ताधारी सरकारचा दबाव वाढत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु

'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
Iran Court, Death sentence, basij militia member murder: इराणच्या न्यायालयाने एका आंदोलनात बसीज मिलिशिया सदस्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली. २०२२ साली हे आंदोलन करण्यात आले होते. या आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याने या आरोपांबाबत साशंकता आहे. पण तसे असले तरीही त्या आरोपींवर हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या आरोपींमध्ये मिलाद अरमून, अलिरेझा काफई, अमीर मोहम्मद खोश अग्बाल, नजरान, होसेन नेमती आणि अलिरेझा बरमार्झपौर्नाक यांचा समावेश आहे. या सर्वांना किसास अल-नफस (इस्लामिक प्रतिशोधात्मक मृत्यूदंड) अंतर्गत शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींना या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. या सहा आरोपींवर बसीज मिलिशिया सदस्य अरमान अलीवर्दी यांच्या हत्येचा आरोप आहे.
आरोपींवर नेमके आरोप काय?
आरोपींवर खून, सार्वजनिक शांतता बिघडवणे असे अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तथापि, या प्रकरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अलीवर्दी रक्तबंबाळ पडलेला दिसत होता आणि एक आंदोलक त्याला लाथा मारत होता. आंदोलकांनी अलीवर्दी यांना भोसकल्याचे सरकारी अधिकारी सांगतात, पण आरोपींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. एखबतानमध्ये राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की अलीवर्दी आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
न्यायालयीन व्यवस्थेवर सरकारचा दबाव?
इराणमधील न्यायालयीन व्यवस्थेवर सत्ताधारी सरकारचा दबाव वाढत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. विरोधी पक्षांचा आणि आंदोलकांना आवाज दडपण्याचे काम सरकारी यंत्रणा करत असल्याचेही आरोप केले जात आहेत. दरम्यान, या आरोपींचा छळ करण्यात आला असून त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात निष्पक्षतेचा अभाव असल्याचा मुद्दा मानवाधिकार संघटनांनी उपस्थित केला आहे.