इराणमध्ये रोज दोनपेक्षा जास्त जणांना फाशी; २०१५मध्ये एक हजार लोकांना फाशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:00 AM2023-11-14T08:00:22+5:302023-11-14T08:00:41+5:30
गेल्या आठ वर्षांत फासावर लटकविण्यात आलेल्या लोकांची ही सर्वाधिक संख्या आहे.
जगात आता बऱ्याच देशांमध्ये फाशीची शिक्षा थांबविण्यात आली आहे किंवा कमी करण्यात आली आहे. गुन्हा केलेल्या व्यक्तीला समूळ संपविण्यापेक्षा त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट केला, तर जग अधिक चांगलं होईल आणि ज्यांनी गुन्हे केलेत त्यांनाही जगण्याची, चुका सुधारण्याची, पश्चात्तापाची संधी मिळेल, हा त्यामागचा विचार. त्यामुळेच काही देशांनी तर कायद्यान्वये फाशी किंवा मृत्यूदंडाची शिक्षाच आपल्या देशातून पार हद्दपार करून टाकली आहे. काही देश मात्र असेही आहेत, ज्यांना जागतिक विचारधारेशी काहीही देणंघेणं नाही. याउलट आपल्या विरोधकांना या जगातून नष्ट करण्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेचा जाणीवपूर्वक वापर केला जातो.
काही देश तर असेही आहेत, जिथे किती लोकांना फासावर लटकवलं, गायब झालेल्या लोकांचं नेमकं काय झालं, हेच तिथे कळत नाही. यात अर्थातच सगळ्यात आघाडीवर आहे तो चीन. चीनमध्ये लोकांना फासावर लटकवलं जाण्याचं प्रमाण जगात सर्वाधिक असावं, असं म्हटलं जातं. अर्थात त्याबाबत खात्रीनं कोणीच सांगू शकत नाही. कारण चीनमधून कोणतीच ‘खरी’ गोष्ट बाहेर येत नाही किंवा अनेक गोष्टी तर तिथून बाहेरच येत नाहीत. त्यामुळे तिथे काय सुरू आहे, हेच बाह्य जगाला कळू शकत नाही. तरीही जगात ज्या देशांमध्ये सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते त्यात चीननंतर आघाडीवर आहेत ते इराण, इजिप्त, सौदी अरेबिया यासारखे देश. या यादीत इराक, सिंगापूर, कुवेत, सोमालिया यासारखेही काही देश आहेत. जिथली खरी आकडेवारी कधी बाहेर येत नाही. त्यात उत्तर कोरिया, व्हिएतनाम, सीरिया आणि अफगाणिस्तान यासारखे देशही आघाडीवर आहेत.
इराणमध्ये दिल्या जाणाऱ्या फाशींची संख्याही अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये काही दिवसांपूर्वी केवळ एकाच दिवशी तब्बल नऊ जणांना फासावर लटकविण्यात आलं! अर्थात फासावर लटकविण्यात आलेल्या लोकांची संख्या प्रत्यक्षात कमी दाखविण्यात आलेली असली, तरी त्याची कारणंही अनेकदा खोटीच असतात, असंही म्हटलं जातं. आताही ज्या नऊ जणांना फासावर लटकविण्यात आलं, त्यांच्या मृत्यूदंडाची खरी कारणं समोर आलेली नाहीत. त्यातल्या दोघांना मात्र व्यभिचाराच्या कारणावरून फाशी देण्यात आल्याचं प्रशासनानं अधिकृतपणे सांगितलं. त्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
इराणमध्ये अलीकडच्या काळात किती जणांना फाशी देण्यात आली असावी? - यंदा तब्बल सहाशे लोकांचं आयुष्य सरकारनं अधिकृतपणे संपवलं. हे कुख्यात गुंड होते, त्यांनी केलेले अपराधही तसेच क्रूर, भयानक आणि मानवतेला काळीमा फासणारे होते, ते कुठल्याही परिस्थितीत जगण्याच्या लायकीचे नव्हते, त्यामुळेच त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला, असे इराण प्रशासनाने जाहीर केले आहे. हे जे सहाशे मृत्यूदंड यंदा आतापर्यंत देण्यात आले आहेत, तेही केवळ ११ महिन्यांच्या काळात! म्हणजे जवळपास दर दिवशी दोन लोकांना इराण सरकारनं फासावर लटकवलं आहे.
गेल्या आठ वर्षांत फासावर लटकविण्यात आलेल्या लोकांची ही सर्वाधिक संख्या आहे. तज्ज्ञांच्या मते ही संख्या यापेक्षाही कितीतरी जास्त आहे. मानवाधिकार संघटनेच्या एका गटानं नुकतीच ही माहिती दिली. इराण हा शरिया कायदा अमलात आणणारा देश आहे. या कायद्याची येथे अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली जाते. जो कोणी या कायद्याचं उल्लंघन करेल, त्याला सक्तीनं गजाआड जावं लागतं. गेल्यावर्षी इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलन अतिशय उग्रपणे पेटलं होतं. देशातली अख्खी जनता रस्त्यावर आली होती. हिजाबच्या विरोधात आणि महिलांना बंधनात ठेवण्याच्या वृत्तीचा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर, थेट ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही निषेध नोंदविण्यात आला होता. साम, दाम, दंड, भेद... सारे प्रकार वापरून इराणनं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. तरीही लोकांनी रस्त्यावर येऊन आपली उग्र आंदोलनं थांबवली नाहीत म्हटल्यावर इराण सरकारनं या आंदोलकांनाच थेट फासावर चढवायला सुरूवात केली होती. त्यावेळीही सरकारनं किती माणसं मारली याची काहीच गणती नाही!
२०१५ मध्ये एक हजार लोकांना फाशी!
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे संचालक महमूद अमिरी मोघदाम यांचं म्हणणं आहे की, खरं ६००पेक्षा जास्त लोकांना दहा महिन्यांपेक्षा कमी काळातच फासावर चढविण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं याचा जाहीर आणि एकत्रित निषेध केला पाहिजे. याबाबतीत गप्प राहणं म्हणजे अपराधाला संमती देण्यासारखंच आहे. गेल्यावर्षी इराणमध्ये ५८२ लोकांना अधिकृतपणे फाशी देण्यात आली होती. २०१५मध्ये साधारण हजार लोकांना म्हणजे ९७२ लोकांना फासावर चढविण्यात आलं होतं!