इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 09:16 AM2024-02-24T09:16:57+5:302024-02-24T09:17:47+5:30
या वर्षी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इराणने जैश अल-अदलचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते.
तेहरान - Iran surgical strike Pakistan ( Marathi News ) पाकिस्तानी हद्दीत जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माईल शाह बक्श आणि त्याच्या काही साथीदारांना ठार केल्याचा दावा इराणच्या लष्करी दलाने केला आहे. इराण इंटरनॅशनल इंग्लिश या वृत्तवाहिनीने शनिवारी सकाळी देशाच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने ही बातमी प्रसारित केली. एक महिन्यापूर्वीही इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश अल-अदलच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही इराणच्या हद्दीत हवाई हल्ला केला होता.
अल अरबिया न्यूज रिपोर्टनुसार, जैश अल अदल दहशतवादी संघटना २०१२ मध्ये उदयास आली. या संघटनेचे प्रमुख केंद्र इराणच्या दक्षिणेकडील सिस्तान बलूचिस्तान इथं आहे. मागील काही वर्षापासून जैश अल अदलने इराणच्या सुरक्षा दलावर अनेकदा मोठे हल्ले केले. गेल्या डिसेंबरमध्येही जैश अल अदलने सिस्तान बलूचिस्तानमध्ये एका पोलीस स्टेशनवर हल्ला करत त्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात जवळपास ११ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांची जीव गेला होता.
पाकिस्तान आणि इराणने गेल्या महिन्यात एकमेकांच्या सीमेत प्रवेश करून 'दहशतवादी संघटनां'वर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे परस्पर मान्य केले होते. दोन्ही देशांमधील कराराची घोषणा पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी आणि इराणी समकक्ष होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. दोन्ही देशांनी आपापल्या क्षेत्रातील दहशतवादाशी लढा देण्याचे आणि एकमेकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मान्य केले. मात्र इराणी सैन्याच्या अलीकडील कारवाया जिलानींच्या दाव्याच्या विरुद्ध आहेत.
दरम्यान, या वर्षी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इराणने जैश अल-अदलचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. इराणच्या हल्ल्यात दोन मुले ठार आणि तीन मुली जखमी झाल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. पाकिस्तानने १७ जानेवारी रोजी इराणमधून आपले राजदूत परत बोलावले होते आणि 'आपल्या सार्वभौमत्वाचे घोर उल्लंघन' केल्याच्या निषेधार्थ इराणच्या राजदूताला देशात परत येऊ देणार नसल्याचे जाहीर केले होते.