"हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही"; इराणची अमेरिकेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:11 PM2023-10-27T12:11:37+5:302023-10-27T12:14:28+5:30

इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायन यांनी सांगितली सत्यस्थिती

Iran gives warning that If America dont stop war between Israel and Hamas in Gaza they will have to pay hefty price as well | "हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही"; इराणची अमेरिकेला धमकी

"हा प्रकार थांबवा, नाही तर तुम्हीही यातून वाचू शकणार नाही"; इराणची अमेरिकेला धमकी

Israel Hamas War, Iran vs America USA: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध प्रचंड तीव्र होताना दिसत आहे. तब्बल २१ दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या देशांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या या युद्धाची झळ अनेकांना बसली आहे. तशातच इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायन यांनी अमेरिकेला खुला इशाराच दिला आहे. गाझामध्ये सुरू असलेली लढाई तात्काळ थांबली पाहिजे. लढाई थांबवली नाही तर ती पॅलेस्टाईनच्या बाहेर पसरू शकते, असे ते म्हणाले आहेत. तसेच, जर युद्ध सुरू राहिले तर अमेरिका देखील त्या युद्धाच्या वणव्यातून स्वत:चा बचाव करू शकणार नाही, असा इशाराच इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला दिला आहे.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत ही माहिती दिली. इराणला शांतता हवी आहे, असे म्हणत हुसेन अमीर अब्दुल्लायन यांनी गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यांवर टीका केली. आम्ही कुठेही युद्धाच्या व्याप्तीचे स्वागत करत नाही. आम्ही मानवतावादी प्रयत्नांमध्ये आमची भूमिका बजावण्यासाठी तयार आहोत. अशा परिस्थितीत गाझा पट्टीतील पॅलेस्टाइनच्या नागरिकांवर इस्रायलची कारवाई तात्काळ थांबली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. अब्दुल्लायन पुढे म्हणाले की, मी अमेरिकन राजकारण्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की आज तुम्ही पॅलेस्टाईनमध्ये सामान्य लोकांच्या नरसंहाराला प्रोत्साहन देत आहात. गाझामध्ये नरसंहार सुरूच राहिला, तर या युद्धाची झळ तुम्हालाही बसल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

ओलिसांची सुटका करण्यास हमास तयार- इराणचे परराष्ट्र मंत्री

ओलिस ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यास तयार असल्याचे हमासने इराणला सांगितले आहे, असेही अमीर अब्दुल्लायन म्हणाले. यासोबतच इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या ६ हजार पॅलेस्टाइन नागरिकांच्या सुटकेसाठीही जगाने दबाव आणला पाहिजे. ही जागतिक स्तरावर सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, इराण, कतार आणि तुर्कीसोबत मिळून या महत्त्वपूर्ण मानवतावादी प्रयत्नात आपली भूमिका बजावण्यास तयार आहे. पण अमेरिका आणि इस्रायलने गाझामधील नरसंहार ताबडतोब थांबवला नाही तर काहीही घडू शकते. गाझामधील सामान्य लोकांवर बॉम्बफेक सुरू राहिल्यास संपूर्ण प्रदेश नियंत्रणाबाहेर जाईल. ज्याचे परिणाम दूरगामी आणि अत्यंत वाईट असतील.

Web Title: Iran gives warning that If America dont stop war between Israel and Hamas in Gaza they will have to pay hefty price as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.