इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:41 PM2024-08-10T15:41:18+5:302024-08-10T15:41:44+5:30
इस्रायलवर हल्ला करण्यावरून सरकार आणि सैन्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आशियामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.
हमासचा नेता इस्माईल हानियाच्या हत्येनंतर इराणइस्रायलविरोधात पेटून उठला आहे. इराणच्या राष्ट्रपतींनी इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिलेले असताना सरकारनंतरची ताकदवर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने राष्ट्रपतींच्या प्लॅनला विरोध केला आहे. इस्रायलवर हल्ला करायचा आहे परंतू नागरी वस्तीवर करायचा की नाही यावरून सैन्य आणि सत्ताधाऱ्यांत दोन गट पडले असून यामुळे इराणचे हल्ला करण्याचे मनसुबे थंड बस्त्यात जाणार असल्याचे संकेत आहेत.
इस्रायलवर हल्ला करण्यावरून सरकार आणि सैन्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आशियामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. अमेरिकेची लढाऊ विमानेती तैनात करण्यात आली असून कोणत्याही क्षणी इराण हल्ला करेल असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. अशातच ही बातमी येत आहे.
इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांना इस्रायलच्या नागरी वस्तीवर हल्ले नको आहेत. तर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला नागरी वस्तींवर मिसाईल आणि रॉकेट हल्ले करायचे आहेत.
इराणच्या याच राष्ट्रपतींच्या शपथविधीला आलेल्या हानियावर इस्रायलने मिसाईल डागले होते. पेजेशकियन हे उदारमतवादी आहेत. नागरी वस्त्यांवर हल्ले केल्यास युद्ध भडकू शकते असे त्यांचे मत आहे. तसेच युद्ध झाल्यास इराणला मोठे नुकसान होऊ शकते, असे त्यांना वाटत आहे. नागरिकांना टार्गेट करण्याऐवजी मोसादच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्याचे मत त्यांनी मांडले आहे. अजरबैजान, इराकी कुर्दीस्तानमध्ये हे ठिकाणे आहेत. यासाठी ते या दोन्ही देशांना याची माहितीही देण्याची मागणी करत आहेत.
इराणचे सैन्य थेट सर्वोच्च नेता अयातुल्ला खामनेई यांना रिपोर्ट करते. यामुळे सरकारमध्ये त्यांची ताकद जास्त असते. इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश खामनेई यांनीच दिले होते. रिवोल्यूशनरी गार्डला हिजबुल्लाहसोबत मिळून हल्ला करायचा आहे. तेल अवीववर थेट हल्ला करण्याची भुमिका एलीट फोर्स कुद्स फोर्सचे कमांडर इस्माइल कानी यांनी घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे पेजेशकियन यांनी रिवोल्यूशनरी गार्ड समर्थित उमेदवाराला पाडले होते. यामुळे आता वर्चस्ववादातून कोणत्या प्रकारचा हल्ला होतो हे येत्या काळात समजणार आहे.