इराण-इस्रायल युद्ध अटळ! सुप्रिम लीडरने सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले, हानियाचा मृत्यू धक्का देणारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 07:47 AM2024-08-01T07:47:40+5:302024-08-01T07:47:54+5:30
इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या हानियाला तो थांबलेल्या घरात ठार करण्यात आले आहे. यामुळे इराण भडकला असून इस्रायलवर हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हमास या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता इस्माइल हानियाचा खात्मा करण्यात आला आहे. इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या हानियाला तो थांबलेल्या घरात ठार करण्यात आले आहे. यामुळे इराण भडकला असून इस्रायलवर हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इराणचे सुप्रिम लीडर आयातुल्लाह अली खामेनेईने इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत. तर इराणच्या या भूमिकेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील आमचा देश लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. वृत्तांनुसार इराण इस्रायलवर पुन्हा एकदा मोठी एअर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलला देखील इराणने हल्ला केला होता. यावेळी इस्रायलने संयमाची भूमिका घेतली होती.
हानियाच्या मृत्यूनंतर मुस्लिम देश एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे इस्रायलवर एकटा इराण नाही तर येमेनचे हुती बंडखोर, इराकच्या इस्लामिक संघटना आणि सीरियाचे लोक मिळून इस्रायलवर हल्ले करण्याची शक्यता आहे. याचबरोबर लेबनानमधील हिजबुल्लाह देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण इस्रायलने त्याच रात्री हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडरही ठार केला आहे.
हे सर्व जमिनीवरील लढाई सोबतच मोठ्या प्रमाणावर मिसाईल, ड्रोन लाँच करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परवानगीशिवाय इस्रायलने हानियाला आमच्या देशात मारले नसावे, असा आरोप इराणने केला आहे. इराणने युद्ध सुरु केले तर इस्रायलला अमेरिकेसारखा बलाढ्य देश रसद पुरविण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिकेतही तेलावरून तणावाचे वातावरण आहे.