एकेकाळी मित्र होते इस्रायल आणि इराण; कोणत्या कारणामुळे बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:58 PM2024-10-02T15:58:18+5:302024-10-02T15:59:04+5:30

Iran-Israel War: नुकताच इराणनने इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवल्यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

Iran-Israel War: Israel and Iran were once friends; What made them bitter enemies? see | एकेकाळी मित्र होते इस्रायल आणि इराण; कोणत्या कारणामुळे बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? पाहा...

एकेकाळी मित्र होते इस्रायल आणि इराण; कोणत्या कारणामुळे बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? पाहा...

Iran-Israel War: एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना, दुसरीकडे आणखी दोन देशांमधील भीषण युद्धाने संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आले आहे. इस्रायल-लेबनॉन युद्धादरम्यान, लेबनॉनच समर्थक इराणने मंगळवारी(1 ऑक्टोबर) रात्री उशिरा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. इराणकडून इस्रायलच्या दिशेने 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितले की, हा हल्ला हमासचा माजी प्रमुख इस्माईल हनिया, हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्ला आणि IRGC कमांडर अब्बास निलफिरोशन यांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून होता. दरम्यान, इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही हल्ले सुरू केले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, हे दोन्ही देश एकेकाळी एकमेकांचे मित्र होते. मग अचानक असे काय झाले की, दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले.

इराण आणि इस्रायल पूर्वी मित्र होते
इस्रायल 1948 साली अस्तित्वात आला. डेव्हिड बेन-गुरियन हे इस्रायलचे पहिले पंतप्रधान बनले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी इस्रायलला नवीन राष्ट्र म्हणून मान्यता दिली. त्यामुळे 1949 साली तुर्कीनेही इस्रायलला मान्यता दिली. त्यानंतर इराणनेही इस्रायलला मान्यता दिली. इस्रायलला मान्यता देणारा तुर्किनंतर इराण हा दुसरा मुस्लिम देश ठरला. इराण आणि इस्रायलमध्ये सर्व काही ठीक चालले होते. कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व नव्हते. इतकंच काय तर, इराकमध्ये सद्दाम हुसेन सत्तेवर होता, तेव्हा त्याने इराणवर हल्ला केला होता. त्या काळात इस्रायलने इराणला शस्त्रे पुरवली होती.

शत्रुत्व का झाले?
इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. यानंतर इराणला इस्लामिक रिपब्लिक घोषित करण्यात आले आणि अयातुल्ला खोमेनी यांनी इराणची सत्ता हाती घेतली. त्यापूर्वी इराणवर पहलवी घराण्याचे राज्य होते. ते त्यावेळी मध्यपूर्वेत अमेरिकेचा प्रमुख मित्र मानला जात होता, हेच कारण होते की, 1948 मध्ये जेव्हा इस्रायल नवा देश बनला, तेव्हा इराणनेही त्याला मान्यता दिली. इस्रायलचे पहिले प्रमुख डेव्हिड बेन-गुरियन हेही इराणचे चांगले मित्र बनले.

पण अयातुल्ला खोमेनी यांच्या सरकारने इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला. तेव्हापासून त्यांचा इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध द्वेष वाढला. अयातुल्ला खोमेनी यांनी इस्रायली सरकारशी सर्व संबंध तोडले आणि इस्रायली नागरिकांच्या पासपोर्टवरही बंदी घातली. त्यामुळे राजधानी तेहरानमधील इस्रायली दूतावास जप्त करून पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच पीएलओकडे सोपवण्यात आले. येथूनच वैर आणखी वाढले.

वर्चस्वाच्या लढाईने परिस्थिती बिघडली
इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या समोर आल्याने इस्रायल आणि इराणमधील संबंध आणखी बिघडले. इस्रायलला काहीही करून इराणला अणुसंपन्न देश होऊ द्यायचा नव्हते. कारण मध्यपूर्वेतील कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे असावीत असे इस्रायलला वाटत नव्हते. 2012 मध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आली होती. इराणने या हत्येचा आरोप इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर लावला.

त्यावेळी प्रदेशातील वर्चस्वावरून दोन्ही देशांमधील वैरही वाढले. या प्रदेशात सौदी अरेबियाची ताकद खूप जास्त होती. अशा परिस्थितीत इराणने स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी इस्रायलशी शत्रुत्व वाढवले. जेणेकरून इराण हा मुस्लिमांचा सर्वात मोठा हितचिंतक असल्याचा संदेश संपूर्ण जगाला देऊ शकेल. यासाठी इराणने हमास आणि हुती बंडखोरांना पाठिंबा दिला. तेव्हापासून या दोन्ही देशातील वैर अद्याप शमलेले नाही.

Web Title: Iran-Israel War: Israel and Iran were once friends; What made them bitter enemies? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.