इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'क्लस्टर वॉरहेड'ने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमध्ये घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:21 IST2026-03-23T08:20:19+5:302026-03-23T08:21:09+5:30
इराणने वापरलेली ही क्षेपणास्त्रे हवेतच फुटून त्यातून अनेक छोटे-छोटे बॉम्ब बाहेर पडतात, ज्यामुळे एका मोठ्या भागाला लक्ष्य करणे सोपे होते.

इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'क्लस्टर वॉरहेड'ने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमध्ये घातला धुमाकूळ
मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकावर पोहोचला आहे. इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला करत युद्धाची ठिणगी टाकली आहे. शनिवारी उशिरा रात्री इराणने जेरुसलेम आणि वेस्ट बँकमधील भागांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे, यावेळी इराणने 'क्लस्टर वॉरहेड' असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इराणने वापरलेली ही क्षेपणास्त्रे हवेतच फुटून त्यातून अनेक छोटे-छोटे बॉम्ब बाहेर पडतात, ज्यामुळे एका मोठ्या भागाला लक्ष्य करणे सोपे होते. या हल्ल्यामुळे जेरुसलेम आणि वेस्ट बँकमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्याची तीव्रता पाहता लाखो नागरिकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. इस्रायली संरक्षण दलाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले असून संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तेहरानवरील हल्ल्याचा घेतला बदला
इस्रायलने काही दिवसांपूर्वी इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या बॉम्बफेकीला उत्तर म्हणून इराणने हा पलटवार केल्याचे मानले जात आहे. निवासी भागांत क्लस्टर मिसाईलचा वापर करणे अत्यंत घातक मानले जाते, तरीही इराणने हे पाऊल उचलल्याने युद्ध आता अधिक हिंसक वळणावर पोहोचले आहे.
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणची धमकी
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेलाही कडक शब्दांत इशारा दिला आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य केले, तर इराण संपूर्ण आखाती देशांमधील ऊर्जा आणि पाणीपुरवठा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल, अशी धमकी दिली आहे. यामुळे आता हे युद्ध केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित न राहता, नागरी सुविधांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अराद आणि डिमोनामध्ये अनेक जखमी
शनिवारी रात्री इस्रायलमधील अराद आणि डिमोना शहरांवर झालेल्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर इस्रायलने आक्रमक होत तेहरानमधील इराणच्या तळांवर हवाई हल्ले केले होते. दोन्ही देशांकडून सातत्याने होणाऱ्या या प्रत्युत्तरामुळे जागतिक बाजारपेठ, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनावर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.