"इस्माईल हानियाच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं कर्तव्य", इराणचे नेते खामेनेई संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:34 PM2024-07-31T18:34:22+5:302024-07-31T18:35:25+5:30
Ayatollah Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी बुधवारी (३१ जुलै) इस्माईल हानियाच्या हत्येबाबत भाष्य केलं आहे.
इराण : गेल्या ९ महिन्यापासून बदल्याच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या इस्रायलनं हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला संपवलं आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. इस्रायलनं इराणच्या तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला केला. यात इस्माईल हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी बुधवारी (३१ जुलै) इस्माईल हानियाच्या हत्येबाबत भाष्य केलं आहे.
इस्माईल हानियाच्या हत्येचा बदल घेण्याची शपथ अयातुल्ला अली खामेनेई यांनी घेतली आहे. तेहरानमध्ये पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात इस्माईल हानियाचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलनं आपल्या कठोर शिक्षेसाठी तयार राहावं, असं अयातुल्ला अली खामेनेई यांनी सांगितलं. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "आम्ही त्यांचा बदला घेणं, हे आमचं कर्तव्य समजतो. हमास प्रमुख इस्माईल हानिया हे आमचे एक प्रमुख पाहुणे होते."
Following this bitter, tragic event which has taken place within the borders of the Islamic Republic, it is our duty to take revenge.
— Khamenei.ir (@khamenei_ir) July 31, 2024
दरम्यान, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. त्यावेळी अनेक निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची योजना हमासचा प्रमुख इस्माईल हानिया यानं आखल्याचा आरोप होता. अखेर इस्रायलनं इस्माईल हानियाला ठार केलं. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तो इराणला गेला होता. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हटलं आहे की, तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. ज्यात हमासचा प्रमुख तसेच एक अंगरक्षक ठार झाला होता.