अमेरिकेच्या इशा-याला न जुमानता इराणने केली मिसाइल टेस्ट! उत्तर कोरियानंतर महासत्तेला चॅलेंज करणारा दुसरा देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 05:01 PM2017-09-23T17:01:13+5:302017-09-23T17:08:41+5:30
अमेरिकेचा एकाबाजूला उत्तर कोरियाबरोबर शाब्दीक संघर्ष सुरु असताना दुस-या बाजूला इराणनेही अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.
तेहरान - अमेरिकेचा एकाबाजूला उत्तर कोरियाबरोबर शाब्दीक संघर्ष सुरु असताना दुस-या बाजूला इराणनेही अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. इराणने शनिवारी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. इराणने खोरामशहर हे नवीन क्षेपणास्त्र विकसित केले असून, तिथल्या सरकारी वाहिनीवर या क्षेपणास्त्र चाचणीची व्हिडीओ दाखवण्यात आला. शुक्रवारी तेहरानमधल्या लष्करी संचलनात हे क्षेपणास्त्र दाखवण्यात आले होते.
इराणने मागच्यावर्षी आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार केला. त्यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले होते. मिसाइल चाचणीचा व्हिडीओ दाखवणा-या वाहिनीने ही चाचणी कधी केली ती तारीख दिली नाही. पण इराणच्या अधिका-यांनी शुक्रवारी आपण लवकरच चाचणी करु असे म्हटले होते.
यापूर्वी इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर अनेक निर्बंध टाकण्यात आले होते. इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात. मागच्यावर्षी अतिशय कठोर आणि झोंबणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली. अमेरिकेचे तत्कालिक परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घेण्यात आल्याची घोषणा केली होती.
प्रदीर्घ काळापासून इराण आणि अमेरिका यांनी आपापल्या ताब्यातील कैद्यांची अदलाबदल केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा झाली. इराणचा हा ऐतिहासक करार अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनीशी जुलै २०१५ मध्ये झाला होता. इराणने आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचा दावा नेहमीच केला होता. निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे इराणचा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विकण्याचा मार्ग मोकळा झाला. अण्वस्त्र निर्मितीवरून निर्माण झालेला वाद निकाली निघाल्यानंतर इराणने पुन्हा एकदा खनिज तेलाचे उत्पादन वाढवले. इराणची भारत आणि युरोपीय देशांना दररोज लाखो बॅरल तेलाचा पुरवठा करण्याची योजना होती.