Iran, US News : अमेरिकी लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:43 AM2020-01-09T06:43:28+5:302020-01-09T06:43:44+5:30

Iran, US News : बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याने हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले.

Iran missile attacks on US military bases | Iran, US News : अमेरिकी लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले

Iran, US News : अमेरिकी लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले

Next

तेहरान/बगदाद : प्रभावशाली लष्करी कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याने हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले. त्यामुळे अमेरिकाइराणमधील वैमनस्य शिगेला पोहोचले असून, मध्यपूर्वेतील तणावात आणखी भर पडल्याने जगभर चिंता व्यक्त केली गेली. सूडाच्या या आगीने होरपळणाऱ्या इराकने मात्र ‘तुमची भांडणे आमच्या भूमीवर लढू नका’, अशी कळकळीची विनंती केली आहे. बगदादपासून ३०० किमीवरील ऐन-अल असद हवाई आणि उत्तरेकडील इर्बिलजवळील या दोन तळांवर हे हल्ले केले गेले.
इराणच्या म्हणण्यानुसार ३०० किमीहून अधिक पल्ला असलेली २२ ‘फतेह-३१३’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पहाटे १.४५ ते २.१५ या अर्ध्या तासात डागण्यात आली. यापैकी १७ क्षेपणास्त्रे ऐन-अल-असद तळावर सोडण्यात आली. त्यातील १५ क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यवेध केला व दोन भरकटली. इर्बिल तळावर सोडलेल्या पाचही क्षेपणास्त्रांनी अचूक मारा केला. अमेरिकी लष्कराने मात्र १५ क्षेपणास्त्रे तळांवर आल्याचे म्हटले.
या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे ८० सैनिक ठार झाले व अनेक हेलिकॉप्टर व अन्य लष्करी साहित्य उद््ध्वस्त करून मोठी हानी करण्यात आली, असा दावा इराणने केला. आणखी हल्ले करण्यासाठी अमेरिका व मित्रपक्षांची १४० ठिकाणे निवडली आहेत. अमेरिकेने पुन्हा आगळिक केल्यास आणखी हल्ले करून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला. अमेरिकेने हे हल्ले झाल्याचे मान्य केले आणि नुकसानीचा नक्की अंदाज घेण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच स्वत:च्या आणि मित्रपक्षांच्या हितांचे परिपूर्णपणे रक्षण करण्यास आपण समर्थ असल्याचेही अमेरिकेने म्हटले.
>इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादू - ट्रम्प
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले की, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक मारले गेले नाहीत. आमचे सैनिक सुरक्षित आहेत. हल्ल्याची आगळीक केलेल्या आणि दहशतवादाला खतपाणी घालणाºया इराणवर आम्ही कडक आर्थिक निर्बंध लादणार आहोत. कोणत्याही स्थितीत आम्ही इराणला अण्वस्त्रे निर्माण करु देणार नाही. मध्यपूर्वेत शांतता कायम राखण्यासाठी ‘नाटो’ देशांनी इकडे लक्ष दिले पाहिजे. रशिया, चीन व युरोपियन देशांनी इराणला मदत करणे थांबवले पाहिजे. इराणला रोखण्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकवटले पाहिजे. भाषणात ट्रम्प यांनी दहशवादी कारवाया करण्यात आघाडीवर असलेल्या इराणचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला मारल्याचे समर्थन केले.
>भारतात पडसाद : या हल्ल्यांनंतर बुधवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स व निफ्टी कोसळला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ४ टक्क्याने वाढ झाली. भारतात सोन्याच्या भावात ८५0 रुपयांनी वाढ झाली आणि चांदीही ५0 हजारांच्या दारात पोहोचली.

Web Title: Iran missile attacks on US military bases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.