इराणची क्षेपणास्त्र चाचणी सुरूच
By admin | Published: March 10, 2016 02:50 AM2016-03-10T02:50:10+5:302016-03-10T02:50:10+5:30
अमेरिकेचे इशारे न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरूच ठेवली आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्याच्या सुरक्षा दलाने दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा केला.
तेहरान : अमेरिकेचे इशारे न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरूच ठेवली आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्याच्या सुरक्षा दलाने दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा केला.
कद्र-एच व कद्र-एफ या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. दीर्घ पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रांनी १,४०० कि. मी. वरील लक्ष्य अचूकपणे भेदले, असे वृत्त सरकारी माध्यमांनी रिव्होल्युशनरी गार्डचे जनरल हुसैन सलामी यांच्या हवाल्याने दिले. इराणच्या उत्तरेकडील अलब्रोझ पर्वतीय क्षेत्रातून ही क्षेपणास्त्रे सोडण्यात आल्याचे सरकारी वृत्तवाहिनीने प्रक्षेपण केले. इराणने मंगळवारीही अनेक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. अमेरिकेने इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याच्यावर निर्बंध लादले होते. इराणवरील अणुकार्यक्रमाशी संबंधित निर्बंध उठविण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे पाऊल उचलण्यात आले होते, हे विशेष; मात्र या निर्बंधांना न जुमानता इराणने क्षेपणास्त्र चाचणी सुरू ठेवली आहे. इराणने केलेल्या चाचण्यांना आपण दुजोरा देऊ शकत नाही. तथापि, असे काही घडले असल्यास प्रत्युत्तरादाखल अमेरिका एकतर्फी किंवा आंतरराष्ट्रीय कारवाई करू शकतो, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले. आमचे शत्रू आमच्यावरील निर्बंध जेवढे वाढवतील तेवढी आमची प्रतिक्रिया तीव्र असेल, असे इराणियन लष्कराच्या हवाई शाखेचे प्रमुख जनरल आमिर अली हजिझादेह यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)