Iran News: शाळेवर कोसळले लढाऊ विमान, वैमानिकासह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:48 PM2022-02-21T18:48:40+5:302022-02-21T18:49:02+5:30
कोरोनामुळे शाळा बंद होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
तेहरान:इराणमध्ये एका शाळेच्या इमारतीवर लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. इराणच्या वायव्येकडील तबरीझ शहरात सोमवारी हा अपघात झाला. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 3 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन क्रू मेंबर्स आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे यात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीविताला हानी झाली नाही. पूर्व अझरबैजान प्रांतातील आपत्कालीन ऑपरेशन्सचे प्रमुख होनवर म्हणाले, "इराणी लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर असताना सकाळी 9:00 वाजता शहराच्या मध्यभागी कोसळले." स्थानिक रेड क्रॉस सोसायटीच्या प्रमुखाने सांगितले की, विमान शाळेच्या बाहेरील भिंतीवर कोसळले, यात चालक दल आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
विमान कोसळल्यानंतर परिसरात आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. इराणच्या राज्य वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये, शाळेच्या ढिगाऱ्यामध्ये आगीमुळे काळवंडलेल्या भिंतीजवळ एक लढाऊ विमान जळताना दिसत आहे. हे विमान तबरेझ येथील शाहिद फकोरी एअरबेसवर तैनात करण्यात आले होते.