ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 02:50 PM2024-01-19T14:50:26+5:302024-01-19T14:51:13+5:30
...चीनच्या अशा वर्तनाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान आणि इराण यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, चीनने दोन्ही मित्र देशांना तणाव संपविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, चीनला अगदी जवळचा मित्र म्हणवणाऱ्या पाकिस्तानला मोठा धोका मिळाला आहे. खरे तर, पाकिस्तानने मिसाइल्स आणि ड्रोनला रोखण्यासाठी मेड इन चायना राडार बसवले आहेत. मात्र हे रडार इराणच्या मिसाईल आणि ड्रोन्सना रोखण्यात अपयशी ठरले. अर्थात इराणने घरात घुसून मारले, तरी पाकिस्तानला कळले नाही. यामुळे पाकिस्तान नाराज झाला आहे. एवढेच नाही, तर इराणने हल्ला केला, पण चीनने त्याची साधी निंदाही केली नाही. चीनच्या अशा वर्तनाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
इराणणे गेल्या बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील कोह-ए-सब्ज भागात एअर स्ट्राइक केले. इराणने कुठलीही सूचना न देता पाकिस्तानात घुसून हा हल्ला केला आणि जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या ठिकानांना निशाणा बनवले. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तसे या हल्ल्या अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावाही इराणने केला होता. यानंतर, या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्ताननेही गुरुवारी इराणमधील सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांतात जेथे बलूच दहशतवादी लपलेल्या ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाइलच्या सहाय्याने एअर स्ट्राइक केले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानच्या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांनी म्हणाले होते की, "दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध आहेत. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केला असला तरी तो हल्ला पाकिस्तानवर नसून पाकिस्तानात लपलेल्या इराणी दहशतवाद्यांवर होता. जैश उल-अदल ही इराणमधील एक दहशतवादी संघटना आहे. तिने पाकिस्तानातील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील काही भागांत आश्रय घेतला आहे."
पाकिस्तान इराण संबंध बिघडले -
इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तेहरानमधील आपल्या राजदूताला परत बोलावले. तसेच, इराणच्या राजदूतालाही पाकिस्तानात परतण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भा बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या होत्या, "पाकिस्तानने आपल्या राजदूताला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच, इराणच्या राजदूताला पाकिस्तानात परत येण्याची परवानगी दिली नाही. ते सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना काही काळ पाकिस्तानात येता येणार नाही."