इराणने रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; पाकिस्तानीला दिली सुपारी, अमेरिकेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 07:49 AM2024-08-07T07:49:26+5:302024-08-07T07:49:40+5:30
अमेरिकेच्या न्याय विभागाने या इराणी प्लॅनचा खुलासा केला आहे. एका पाकिस्तानी नागरिकाला इराणने यासाठी काम दिले होते.
इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हमास दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला आपल्या देशात पाहुणा म्हणून बोलवून राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात सन्मान दिला होता. या प्रमुखाला इस्रायलने ठार केले होते. आपल्या देशात घुसून मारले म्हणून इराण खवळला आहे. याच इराणने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य राजकीय नेत्यांच्या हत्याचे कट रचल्याचे उघड झाले आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने या इराणी प्लॅनचा खुलासा केला आहे. एका पाकिस्तानी नागरिकाला इराणने यासाठी काम दिले होते. आसिफ रजा मर्चंट असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर राजनैतिक हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प आणि माजी अमेरिकी अधिकाऱ्यांना मारण्याचा इराणचा प्लॅन होता.
ब्रुकलीनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला या हत्या केल्या जाणार होत्या. यासाठी त्याला न्यूयॉर्क शहराचा दौरा करणे आणि एका शूटरसोबत काम करण्यास सांगण्यात आले होते. पाकिस्तान आणि मुस्लिम जगताला नुकसान पोहोचविणाऱ्या लोकांना संपविण्याचे काम देण्यात आले होते, असे मर्चंटने म्हटले आहे.
मर्चंटला १२ जुलैला अटक करण्यात आली आहे. तो सर्व प्लॅनिंग करून अमेरिका सोडण्याची तयारी करत होता. त्याने शूटर शोधले होते जे अमेरिकेचेच गुप्तहेर निघाले आणि इराणचा सगळा प्लॅन उघडा पडला. रेकी करण्यासाठी एक महिला आणि हत्येनंतर पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी २५ लोक त्याला हवे होते.