Iran Protest: आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 08:15 PM2022-10-02T20:15:38+5:302022-10-02T20:16:19+5:30

Iran Protest: शिया कमांडरने 15 वर्षीय सुन्नी मुलीवर बलात्कार केल्यामुळे हिंसाचार भडकला आहे. हिंसाचारात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यूही झाला आहे.

Iran Protest: First the death of a young woman, now the rape of a minor girl; Violence flares up again in Iran | Iran Protest: आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

Iran Protest: आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

Next

Iran Sunni Girl Rape:इराण हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर हिजाबचा वाद थांबलेला नाही, तोच देश आणखी एका वादाने पेटला आहे. इराणमध्ये एका सुन्नी मुलीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. बलुच भागात हिंसक निदर्शने होत आहेत. आंदोलकांनी पोलिस स्टेशनही जाळले. आंदोलकांशी पोलिसांची हिंसक झटापटही झाली. पोलिसांच्या गोळीबारात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बलात्कार प्रकरणावरून इराणमध्ये ठिणगी 
इराणमधील जाहेदान या सुन्नी बहुल शहरात शिया कमांडरच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. कर्नल इब्राहिम नावाच्या शिया कमांडरने 15 वर्षांच्या बलुच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इराणचे सुन्नी धर्मगुरू मौलवी अब्दुल हमीद यांनी सुन्नी मुलीवर झालेल्या बलात्काराची पुष्टी केल्यावर इराणच्या आग्नेय भागात निषेध सुरू झाला. लोकांचा राग शुक्रवारच्या नमाजानंतरच रस्त्यावर दिसून आला. बलुच समुदायाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले. यात लहान मुलांचाही सहभाग होता. हा राग शिया कमांडरवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाविरोधात असल्याने सरकार आणि पोलीस आंदोलकांच्या निशाण्यावर होते.

हिंसक निदर्शनांमध्ये 36 हून अधिक ठार
सुन्नी आंदोलकांनी जाहेदान शहरातील अनेक पोलीस ठाण्यांना घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या जमावावर गोळीबार सुरू केला. जमावावर झालेल्या या गोळीबारात 36 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोळीबार आणि त्यात लोकांचा मृत्यू झाल्याने आंदोलकांचा संताप आणखी तीव्र झाला आहे. यानंतर या लोकांनी सरकारी इमारतींपासून ते पोलिस ठाण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. शिराबाद येथील पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली.

हिंसक निदर्शनात एका कमांडरचाही मृत्यू झाला
इराणी पोलीस आणि बलुच आंदोलकांमध्ये झालेल्या या चकमकीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा एक कमांडरही ठार झाला. त्यानंतर हा हिंसाचार इराणच्या अनेक शहरांमध्ये पसरला. कुर्दिस्तानमध्ये, आयआरजीसी सैन्याने आंदोलकांवर थेट गोळीबार सुरू केला. निदर्शने आणि हा हिंसाचार थांबवण्यासाठी इराण सरकारने झाहेदानचे इंटरनेट बंद केले, पण तोपर्यंत हा गोंधळ इतर शहरांमध्ये पसरला होता.

कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप
इराणमधील सुरक्षा दलांनी आपल्या कमांडरला वाचवण्यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांचे अपहरण केले आणि मुलीला काहीही झाले नाही असे विधान करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांवर तक्रार नोंदवू नये म्हणून दबावही टाकण्यात आला, मात्र मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली आणि हे प्रकरण सुन्नी समाजाचे नेते आणि धर्मगुरूंपर्यंत पोहोचताच संपूर्ण बलुच आणि सुन्नी समाज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला.

Web Title: Iran Protest: First the death of a young woman, now the rape of a minor girl; Violence flares up again in Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.