इराणचा अमेरिकेच्या इराकमधील तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 08:52 AM2020-01-13T08:52:03+5:302020-01-13T09:08:57+5:30
इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथील तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली.
तेहरान/बगदाद - कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये वाढलेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. अमेरिकेविरोधात आक्रमक झालेल्या इराणने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून, रविवारी इराणी सैन्याने अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. यामध्ये चार जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मात्र या हल्ल्याची कुठलाही गट किंवा संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र हा हल्ला इराकमधील इराणचा पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील अल बलाद एअरबेसवर अमेरिकेच्या लष्करी तळांवर एकूण 8 रॉकेट सोडण्यात आले. ज्यामध्ये चार जण जखमी झाले. अल बलाद एअरबेस इराकमधील एफ-16 विमानांचा मुख्य तळ आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडून खरेदी केली होती.
अल बलाद येथील तळावर अमेरिकन हवाई दल आणि कंत्राटदारांचे एक पथकही आहे. मात्र यापैकी अनेक जणांना अमेरिका आणि इराणध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर या तळावरून हटवण्यात आले आहे.
युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली
कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...
ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळी
दरम्यान, 8 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचा हेतू कुठल्याही अमेरिकी सैनिकाची हत्या करण्याचा नव्हता, असा दावा इराणी गार्डने केला आहे. मात्र अमेरिकेच्या हवाई तळावर इराणकडून पुन्हा एकदा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे हे प्रकरण अद्याप शांत होणारे नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच अमेरिकी सैन्य हे कुठल्याही हल्ल्याला नेहमीच प्रत्युत्तर देत आलेले आहे. त्यामुळा या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अजूनच वाढू शकतो.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला असतानाच बुधवारी इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळून 176 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर युक्रेनचे हे प्रवासी विमान चुकून पाडल्याची कबुली इराणने शनिवारी दिली होती. हे विमान उड्डाण करीत असताना तेहरानजवळील लष्करी तळाच्या दिशेने अचानक वळल्याने ते पाडले गेले असावे, असेही इराणने म्हटले होते. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना बगदादजवळ ड्रोन हल्ला करून अमेरिकेने ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर लगेचच युक्रेनचे विमान इराणमध्ये कोसळले होते.