इराणने १० वर्षे अणुकार्यक्रम बंद करावा -ओबामा
By admin | Published: March 4, 2015 12:13 AM2015-03-04T00:13:51+5:302015-03-04T00:13:51+5:30
इराणला आमच्याशी करार करायचा असल्यास कमीत कमी दशकभरासाठी आपला आण्विक कार्यक्रम बंद करण्याची मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.
वॉशिंग्टन : इराणला आमच्याशी करार करायचा असल्यास कमीत कमी दशकभरासाठी आपला आण्विक कार्यक्रम बंद करण्याची मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इस्रायली पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू हे अमेरिकी संसदेला संबोधित करण्यापूर्वी हा इशारा दिला आहे.
जागतिक महासत्ता व इराण यांच्यातील अणुचर्चा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या ३१ मार्चपूर्वी याची रूपरेषा जगापुढे येणे अपेक्षित आहे. दरम्यान, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू हे हा करार करू नये म्हणून ओबामा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी काँग्रेसला आवाहन करणार आहेत. नेतान्याहू मंगळवारी काँग्रेसला संबोधित करतील.
रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले सभागृह अध्यक्ष जॉन बोईनर यांनी त्यांना आमंत्रित केले असून यावरून डेमोक्रॅटिक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेतान्याहू यांना येत्या दोन आठवड्यांत देशांतर्गत निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या लिकुड पक्षावर इराणशी जागतिक महासत्तांचा अणुकरार होऊ नये, म्हणून देशातून मोठा दबाव आहे. नेतान्याहू हे ओबामा यांची भेट न घेताच मायदेशी परतण्याचे संकेत आहेत.
इराणशी अणू वाटाघाटीवरून इस्रायलशी निर्माण झालेले मतभेद ही कायमस्वरूपी बाब नाही, असा दावाही ओबामांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ओबामांनी इशारावजा शब्दांत स्पष्ट केले की, नेतान्याहू यांचा इराणशी अणुकरार करण्याबाबत अगोदरचा दृष्टिकोन चुकीचा आहे. इस्रायलला असलेला कथित धोका रोखण्यासाठीचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचा दावाही त्यांनी केला.
तत्पूर्वी, नेतान्याहू यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषणाच्या पूर्वसंध्येला सांगितले की, अमेरिका व इराण यांच्यातील अणुकराराने ‘इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.’ अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी व त्यांचे इराणी समपदस्थ मोहंमद जावेद जरीफ यांच्यात स्वीत्झर्लंडमध्ये चर्चा सुरू असून ती बुधवारी समाप्त होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)