एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:23 AM2024-10-05T07:23:13+5:302024-10-05T07:23:31+5:30
Iran Vs Israel: इस्रायलला संपविणे गरजेचे; इराणचे नेते खोमेनी यांचा इशारा; अरब देशांनी एकत्र यावे
तेहरान/जेरुसलेम/बेरुत : इस्रायलवर मंगळवारी करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ला ही खूप लहान शिक्षा हाेती. गरज पडली तर पुन्हा हल्ला करू, असा इशारा इराणचे सर्वाेच्च नेते अली खोमेनी यांनी दिला. इस्रायल कधीही हमास आणि हिजबुल्लाला पराभूत करू शकणार नाही. इस्रायलला संपिवणे आवश्यक असून, त्यासाठी अरब देशांना एकत्र येण्याचे आवाहनही खामेनी यांनी केले. तर, इस्रायलने हल्ला केल्यास आधीपेक्षा आणखी तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनी दिला आहे. ते लेबनानमध्ये बाेलत हाेते.
हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले. त्यावेळी इराणमध्ये खोमेनी यांनी शुक्रवारी नमाज अदा केली. त्यानंतर त्यांनी लाेकांना संबाेधित केले. खामेनी यांनी जानेवारी २०२०नंतर प्रथमच शुक्रवारच्या नमाजचे नेतृत्त्व केले. त्यावेळी इराणच्या रिव्हाॅल्यूशनी गार्ड्सचे जनरल कासिम सुलेमानी याच्या मृत्यूनंतर ते उपस्थित झाले हाेते. गेल्या वर्षी ७ ऑक्टाेबरला हमासच्या नेतृत्त्वाखाली झालेला हल्ला पॅलिस्टिनी नागरिकांसाठी केलेली वैध कारवाई हाेती. तर, मंगळवारी केलेला क्षेपणास्त्र हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, देशाचा कायदा आणि इस्लामिक मान्यतेवर आधारित हाेता, असे खामेनी यांनी म्हटले. दरम्यान,
हिजबुल्लाचा संपर्कप्रमुख माेहम्मद स्केफी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. (वृत्तसंस्था)
मुख्य रस्ता उद्ध्वस्त; रसद तोडण्याचा प्रयत्न
nलेबनाॅन आणि सीरियाला जाेडणारा प्रमुख रस्ता उद्ध्वस्त करण्यात इस्रायलला यश आले. याशिवाय लेबनाॅन-सीरियाला जाेडणाऱ्या ३.५ किलाेमीटर लांबीचा सुरुंग हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आला.
nयाद्वारे इराणची शस्त्रे हिजबुल्लाला लेबनाॅनमध्ये पुरविण्यात येत हाेती. संघर्ष सुरु झाल्यानंतर प्रथमच एखाद्या प्रमुख मार्गाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. रसद माेडण्याचा प्रयत्न इस्रायलने केला आहे.
भारताकडून चिंता व्यक्त
इस्रायल-इराण वाढत्या तणावावरून भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी सांगितले की, लाेकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल आणि इराणसाठी उड्डाणे सुरू आहेत, जेणेकरून लाेकांना या देशांमधून भारतात परतता येईल.