इस्रायलविरोधात इराण मोठी कारवाई करणार; इराणी सैन्याला तयार राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:55 PM2024-11-01T15:55:30+5:302024-11-01T15:56:09+5:30
इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत.
Israel-Iran War : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी देशाच्या लष्करी नेतृत्वाला इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. इराणमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती मिळाल्यावर खमेनी यांनी हा आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात काही इराणी सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणी लष्कर इस्त्रायली सैन्य ठिकाणांची यादी तयार करत आहेत. या ठिकामांवर हलवकरच हल्ले होऊ शकतात. इराण इराकच्या मार्गावर असलेल्या आपल्या फायटरद्वारे हा हल्ला करू शकतो. या रणनीतीद्वारे इराण स्वत:च्या भूभागावर थेट हल्ला टाळून इस्रायलचे मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे मानले जाते.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या सुरक्षेबाबत आपल्या धोरणात कोणतीही शिथिलता आणली जाणार नसल्याचे म्हटले आहे. नेतन्याहू यांनी हल्ल्यानंतर घोषणा केली की, इस्रायली हवाई दलाने महत्त्वाच्या इराणी लष्करी लक्ष्यांना लक्ष्य केले आणि दावा केला की, या हल्ल्यामुळे इराणची हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त झाली आहे. ते असेही म्हणाले की, इराणला अण्वस्त्रांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर इराणने कठोर बदला घेण्याची धमकी दिली आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिकेच्या निवडणुकीनंतर इराण या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकेल. अशा परिस्थितीत मध्यपूर्वेत पुन्हा एकदा गंभीर धोका निर्माण झाला आहे. इराण आणि इस्रायलमधील हा वाद आणखीनच कायम राहिल्यास केवळ या दोन देशांवरच नव्हे, तर संपूर्ण क्षेत्रावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.