संचलनात क्षेपणास्त्रांच्या जागी मोबाईल दवाखाने; इराणचा सैन्यदिन अनोख्या पद्धतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:11 AM2020-04-20T05:11:51+5:302020-04-20T05:12:19+5:30
इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती.
इतिहासात नोंद होतेय, पुढच्या पिढ्या आपलं उदाहरण देऊन सांगणार आहेत की, एक काळ असाही होता मानवी इतिहासात की, ‘दुनियेच्या तमाम देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं होती, काहींकडे तर आण्विक अस्त्रं बनविण्याची क्षमता होती. मात्र, त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्स नव्हती. माणसं मरत होती, तर दवाखान्यात पलंग नव्हते, डॉक्टरांना सुरक्षा साधनं नव्हती. त्यांची सारी हत्यारंच फोल ठरली होती!’
एरवी हे फॉरवर्ड वाक्य विनोद म्हणून सोडून देता आलं असतं, पण आज ती वस्तुस्थिती आहे. वास्तव आहे ते चालू वर्तमानकाळाचं. ते किती बोचरं असावं याचं चित्र शुक्रवारी इराणमध्ये दिसलं.
१७ एप्रिल हा इराणचा राष्ट्रीय सैन्यदिन. एरवी सैन्यदिन म्हटल्यावर परेड अर्थात संचलन होतंच. आपल्या देशाची संरक्षण सज्जता दाखवली जाते. डोक्यावर फायटर प्लेन भिरभिरतात. ते कसरती करतात. आधुनिक हेलिकॉप्टर्स, तोफा, बंदुका, क्षेपणास्त्रं, पाणडुबी, बंदुका या साऱ्याचं प्रदर्शन केलं जातं. आपल्या देशाची ताकद दाखवून देशवासीयांना सांगितलं जातं की, घाबरू नका आपला देश संरक्षण सिद्ध आहे. मात्र, १७ एप्रिल २०२० हा देश मानवी इतिहासात वेगळा म्हणून नोंदवला जाईल. इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती.
सोबत मोबाईल दवाखाने होते, डिसइन्फेशक्न व्हेईकल्स होती. कोरोनाच्या महामारीने साºया इराणलाच पोखरलं असताना सैन्य देशवासीयांना सांगत होतं की, आम्ही तुमच्या मदतीला उतरलो आहोत, पण यावेळी जगवणारी साधनं वेगळी आहेत. बंदुका, तोफांचा काही उपयोग नाही, आम्ही वेगळी शस्त्रं घेऊन लढतोय. ‘डिफेंडर्स ऑफ द होमलँड, हेल्पर्स ऑफ द हेल्थ.’ असं या परेडचं नाव होतं. छोटेखानी परेड झाली. ट्रेनिंग सेंटरपुरती मर्यादित होती. कमांडर चेहºयाला मास्क लावून शिस्तीत संचलन करत होते. ही लढाई इराण जिंकणार का? तर जिंकणार असं सांगत असताना अध्यक्ष हसन रुहानी सांगतात, ‘हे संचलन वेगळं आहे. शत्रू दिसत नाही, सैन्याचं काम डॉक्टर्स आणि परिचारिका करत आहेत.’
खरंच इराणची लढाई मोठी आहे. तेथे बाधितांचा आकडा (ही बातमी लिहीत असताना) ८०,८६८ आहे. ५,०३१ लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाशी लढून देश वाचवण्याचं मोठं आव्हान आज इराणचे सैनिक, त्यात डॉक्टर, परिचारिकाही पेलत आहेत, झुंजत आहेत नव्या शस्त्रांनिशी..