इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:18 PM2024-10-02T15:18:39+5:302024-10-02T15:19:42+5:30
इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.
इराणनेइस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यानंतर, आता इस्रायल-इराण संघर्षात भारताचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इराणचे राजदूत इराज इलाही यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. मध्यपूर्वेत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे इराज इलाही यांनी म्हटले आहे. याशिवाय, इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे.
इराणचा इस्रायलला इशारा -
इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही एनडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले, इराणचा हल्ला म्हणजे इस्रायलला प्रत्युत्तर आहे. एवढेच नाही तर, इस्रायलने इराणच्या संपत्तीवर आणि त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले करणे सुरूच ठेवले, तर इराण पुन्हा पुन्हा हल्ले करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना इराज इलाही म्हणाले, इस्रायलकडून जे हल्ले केले जात आहेत, त्याकडे संपूर्ण जगातील लोकांचे लक्ष आहे. इस्रायलने सर्व मानवाधिकार कराराचे उल्लंघन केले आहे. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने रक्तपात होत आहे. यामुळे लोक संतप्त आहेत.
यापुढे बोलताना ते म्हणाले, इस्रायली पंतप्रधान या शतकातील 'नवे हिटलर' आहेत. इस्रायलवरील मिसाइल हल्ले म्हणजे प्रत्युत्तरात केलेली कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, इराण आपल्या आंतरराष्ट्रीय हीत आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसंदर्भात चेष्टा करत नाही.
'भारताचा दोन्ही देशांसोबत घनिष्ठ संबंध' -
इराज इलाही म्हणाले, मिडिल ईस्टमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामागचे कारण सांगताता इलाही म्हणाले, भारताचा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत घनिष्ट संबंध आहे. इस्रायलला समजावण्यात आणि रोखण्यात भारत मदद करेल, अशी आशाही इराज इलाही यांनी व्यक्त केली आहे. यावेळी, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 'हे युद्धाचे युग नाही', या विधानाचा उल्लेख करत, आम्ही इराणमध्येही हे मानतो, पण जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला केला तर तो देश काय करू शखतो?' असेही ते म्हणाले.