अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली युद्धाची धमकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 22:10 IST2025-03-30T22:10:22+5:302025-03-30T22:10:53+5:30
अमेरिका आणि इराणमधील संबंध आणखी बिघडले आहेत.

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली युद्धाची धमकी...
America-Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इराणने अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्यात येईल, अशी थेट धमकी त्यांनी इराणला दिली आहे. याशिवाय इराणला कठोर आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. यामुळे या दोन्ही देशातील संबंध अधिक बिघडू शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, आवश्यक पातळीपेक्षा जास्त युरेनियम समृद्ध इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवण्याचे काम करत असल्याचा पाश्चात्य देशांचा दावा आहे. पण, इराण हे आरोप फेटाळून लावतो आणि त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचा दावा करतो. अशातच, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमासंदर्भातील पत्राला उत्तर म्हणून अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिडले आणि त्यांनी इराणला बॉम्बची धमकी दिली.
इराण आणि अमेरिकेतील वाढता तणाव
2018 पासून अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, गाझामध्ये इस्रायल-हमास संघर्षादरम्यान इराण समर्थित गटांच्या नेत्यांवरही हल्ले झाले. सध्या, अमेरिका येमेनमधील हुथी बंडखोरांवर हवाई हल्ले करत आहे, ज्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक गडद झाला आहे. याशिवाय इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत लष्करी कारवाईची भीती अजूनही कायम आहे. इराणने आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत कोणताही तोडगा काढला नाही, तर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांची प्रतिक्रिया अधिक कडक होऊ शकते, असे मानले जात आहे.