इराणवरील निर्बंध हटवले
By admin | Published: January 18, 2016 03:40 AM2016-01-18T03:40:59+5:302016-01-18T03:40:59+5:30
इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार महासत्तांशी केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रविवारी त्याच्यावरील
वॉशिंग्टन/ व्हिएन्ना : इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार महासत्तांशी केल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रविवारी त्याच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले. हे अतिशय कठोर आणि झोंबणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली.
आजचा दिवस हा सुरक्षित जगासाठीचा म्हणून महत्त्वाचा आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी व्हिएन्नामध्ये सांगितले. जागतिक अणुऊर्जा संस्थेने इराणने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे प्रमाणपत्र दिल्याचेही केरी म्हणाले.
अमेरिकन निर्बंधांशी संबंधित जी आश्वासने होती त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे सांगताना केरी यांनी इराणवर लादलेले निर्बंध काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. प्रदीर्घ काळापासून इराण आणि अमेरिका यांनी आपापल्या ताब्यातील कैद्यांची अदलाबदल केल्यानंतर काही तासांतच ही घोषणा झाली. इराणचा हा ऐतिहासक करार अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनीशी जुलै २०१५ मध्ये झाला होता.
इराणने आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचा दावा नेहमीच केला होता. निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे आता इराणला तेल आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येईल, बँकेच्या जागतिक व्यवस्थेशी इराण जोडला जाईल.
अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध काढून टाकण्यात आल्याच्या आदेशावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली.
कष्टसाध्य करार-चीन
बीजिंग : इराणसोबत करार हा अतिशय कष्टांनी साध्य झालेला असून त्यामुळे जे निर्बंध काढून घेण्यात आले त्याबद्दल आनंद व्यक्त करावा एवढे ते महत्त्वाचे आहेत, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)