इराणवरील निर्बंधांचा भारताला बसणार फटका; अमेरिकेचा कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:27 PM2018-09-14T23:27:55+5:302018-09-14T23:28:22+5:30
इराणविरुद्ध लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे.
वॉशिंग्टन : इराणविरुद्ध लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनुसार, इतर देशांना इराणकडून तेल खरेदी पूर्ण थांबवून शून्यावर आणावी लागणार आहे. भारतालाही या निर्बंधांचा फटका बसणार आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मे महिन्यात इराणसोबतचा अणुकरार मोडीत काढला आणि नोव्हेंबरमध्ये इराणविरुद्ध निर्बंध घोषित केले. इराणची तेल निर्यात शून्यावर आणण्याची अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेच्या सहायक विदेशमंत्री (अर्थ व व्यवसाय) मनीषा सिंग काँग्रेसच्या सुनावणीत म्हणाल्या की, इराणविरुद्ध नव्याने लावलेल्या निर्बंधांत जे देश सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाईची तयारी आम्ही केली आहे. प्रशासन सर्व सहकारी व भागीदार देशांशी बोलत आहे. या निर्बंधांची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
आयातीची समस्या
अमेरिकेने म्हटले की, येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत भारत आणि इतर सर्व देशांनी इराणी तेलाची आयात शून्यावर आणायला हवी. या निर्बंधांतून कोणालाही सवलत मिळणार नाही. अमेरिकेच्या निर्बंधांचा भारताला मोठा फटका बसेल. कारण इराण हा भारताचा इराक व सौदी अरेबिया यांच्यानंतरचा तिसºया क्रमांकाचा मोठा तेल पुरवठादार देश आहे.